टी२० विश्वचषक २०२२ मध्ये बांगलादेशला भारताविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला रोमहर्षक सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली. एकवेळ भारतीय संघ या सामन्यात मागे असताना भारताचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवने चाहत्यांना प्रोत्साहित केल्यानंतर मैदानात भारतीय चाहत्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.
अर्धातास पावसाने गोंधळ घातला त्यामुळे जो मोमेंटम होता तो ब्रेक झाला आणि भारत त्या सामन्यात पुन्हा आला. पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात परत आणले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत सामन्यातील चक्र फिरवले.
टीम इंडियाला अशावेळी आणखी प्रोत्साहनाची गरज होती. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला सूर्यकुमार यादव याने आपल्या जर्सीवर लिहिलेल्या इंडिया नावाकडे इशारा करत भारतीय चाहत्यांना उत्साहित केले. त्यानंतर भारतीय चाहते मोठ्याने ‘इंडिया इंडिया’ असे घोषणा देताना दिसले. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सूर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये असून या विश्वचषकात भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध देखील त्याने केवळ १६ चेंडूंवर ३० धावा चोपलेल्या. टी२० विश्वचषकात सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे.