अॅडलेड :ऋषभ पंतला शीर्ष फलंदाजी फळीत खेळवण्याची मागणी होत असली, तरीही बुधवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात भारतीय संघ केएल राहुलसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बांगलादेशचा संघ उलटफेर करण्यात सक्षम असला तरीही या सामन्यात भारत विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथील जलद आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला काही मुद्दय़ांवर विचार करण्यास भाग पाडले. केएल राहुलला आतापर्यंत तीन सामन्यांत केवळ २२ धावाच करता आल्या आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघांविरुद्ध तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. द्रविडला मात्र राहुलवर विश्वास असल्याने तो अंतिम एकादशमध्ये राहण्याची शक्यता आहे.मुस्ताफिजुर रहमान, तस्किन अहमद, मेहदी हसन आणि कर्णधार शाकिब अल हसन यांचे आक्रमण चांगले असले तरीही त्यामध्ये अभाव जाणवतो.
सूर्यकुमार, विराट, रोहितकडून अपेक्षा
सूर्यकुमार यादव, विराट कोहली यांनी विश्वचषक स्पर्धेत चांगल्या खेळी केल्या आहे, तर रोहित शर्माने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. पंतला अंतिम एकादशमध्ये संधी मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे असेल. दिनेश कार्तिकला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती आणि त्यामुळे बांगलादेशविरुद्ध त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहे.
अश्विन की अक्षर?
बांगलादेशकडे चार डावखुरे फलंदाज आहेत. यामध्ये शाकिब, सलामी फलंदाज सौम्य सरकार आणि नजमुल हुसैन शंटो, तसेच मध्यक्रमात अफीफ हुसैनचा समावेश आहे. त्यामुळे रविचंद्रन अश्विनला संघात कायम राखले जाते किंवा त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी दिले जाते हे पाहणे उत्सुकतेचे असेल. भारतीय जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीचे आव्हान बांगलादेशच्या फलंदाजांसमोर असेल. बांगलादेशचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसाठी पूरक असलेल्या खेळपट्टीवर अडखळताना दिसले. आतापर्यंत तीन सामन्यांत केवळ शंटोला १००हून अधिक धावा करता आल्या आहेत.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक हुडा
बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसैन शंटो, सौम्य सरकार, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, मेहदी हसन मिराज, शोरफुल इस्लाम, इबादत हुसैन, नूरुल हसन, लिटन दास, तस्किन अहमद, हसन महमूद, यासिर अली, नसुम हुसैन, मुस्तफिजुर रहमान
’ वेळ : दुपारी १.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी