T20 World Cup 2022 India vs England 2nd semifinal When and Where to watch:ऑस्ट्रेलियामधील अ‍ॅडलेडच्या मैदानावर आज भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान उपांत्यफेरीचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. बादफेरीतील या सामन्यामधून जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतानाच आजच्या सामन्यामधून अंतिम सामन्यातील दुसरा दावेदार संघ कोण असेल हे स्पष्ट होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला तुल्यबळ इंग्लंडचा अडथळा पार करावा लागणार आहे. भारत आणि इंग्लंड या जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये एकहाती सामने जिंकवून देणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दडपणाखाली, मोक्याच्या क्षणी जे खेळाडू आणि जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असेल. दोन्ही संघांमधील कोणत्या खेळाडूंवर संघांची भिस्त असेल, सामना नेमका कधी कुठे पाहता येईल यावर टाकलेली नजर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट-सूर्यकुमार जोडी फलंदाजीचा कणा, रोहितची कामगिरी चिंतेचा विषय
यंदाच्या टी-२० विश्वचषकामध्ये ‘अव्वल १२’ फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारताचा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे अव्वल दोन स्थानांवर होते. एकीकडे कोहलीने संयम आणि आक्रमकता यांच्यात उत्तम समतोल साधताना पाच सामन्यांत तीन अर्धशतके साकारली. दुसरीकडे सूर्यकुमारने आपल्या कलात्मक आणि वैविध्यपूर्ण फटक्यांनी सर्वाना थक्क करून सोडले. भारताला कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीची चिंता आहे. नेदरलँड्सविरुद्धचे अर्धशतक वगळता रोहितला धावांसाठी झगडावे लागले आहे.

राहुलला सूर गवसला, यष्टीरक्षक कोण?
केएल राहुलने गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके करत सूर गवसल्याची ग्वाही दिली आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी हार्दिक पंड्यावर असेल. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कोणाला पसंती मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

बटलरची कामगिरी इंग्लंडला चिंतेचा विषय
कर्णधार जोस बटलर आणि बेन स्टोक्स या इंग्लंडच्या दोन प्रमुख खेळाडूंना या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यांत आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीर बटलरने चार सामन्यांत ११९ धावा केल्या आहेत आणि त्याला केवळ एकदाच अर्धशतकी मजल मारता आली आहे. मात्र, भारताविरुद्ध तो आपला खेळ उंचावण्यासाठी उत्सुक असेल.

डेव्हिड मलान सामन्याला मुकण्याची शक्यता
स्टोक्सला चार सामन्यांत केवळ ५८ धावाच करता आल्या आहेत. परंतु महत्त्वाच्या सामन्यांत निर्णायक भूमिका बजावण्यात तो सक्षम आहे. या दोघांना सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांची साथ लाभेल. मात्र, जायबंदी डेव्हिड मलान या सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याने फिल सॉल्टला संधी मिळू शकेल.

फिरकी गोलंदाजांना प्राधान्य
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अ‍ॅडलेड ओव्हलवर होणार आहे. हा सामना यापूर्वीच्या दोन सामन्यांदरम्यान वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर होणार आहे. त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. भारताने ‘अव्वल १२’ फेरीत ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा अक्षर पटेल या दोन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता उपांत्य फेरीतही हेच दोघे खेळल्यास त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

चहल खेळणार का?
अक्षरच्या जागी यजुर्वेंद्र चहलला खेळवण्याचाही भारत विचार करू शकेल. मात्र, त्यामुळे फलंदाजीची बाजू काहीशी कमकुवत होईल. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग सांभाळणे अपेक्षित आहे. 

इंग्लंडकडे वेगवान गोलंदाजांचा तोफखाना
वेगवान गोलंदाज सॅम करन (चार सामन्यांत १० बळी) आणि मार्क वूड (चार सामन्यांत ९ बळी) यांनी इंग्लंडकडून या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेषत: डावखुऱ्या करनला अखेरच्या षटकांतही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखण्यात यश आले आहे. त्याच्याकडून इंग्लंडला पुन्हा दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. वूडच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

फिरकी गोलंदाजांमध्ये रशीद आणि मोईन अली
अ‍ॅडलेडच्या फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर लेग-स्पिनर आदिल रशीद आणि ऑफ-स्पिनर मोईन अली यांचे योगदान इंग्लंडसाठी निर्णायक ठरू शकेल. रशीदला या स्पर्धेत केवळ एक बळी मिळवता आला असून मोईनची बळींची पाटी कोरी आहे.

भारताचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट
इंग्लंडने मायदेशात झालेला २०१९चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्या संघातील बरेचसे खेळाडू सध्याच्या इंग्लंड संघाचा भाग आहेत. हा अनुभव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. दुसरीकडे, भारतीय संघाला गेल्या काही वर्षांत ‘आयसीसी’च्या स्पर्धातील बाद फेरीत सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. २०१४ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना, २०१६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना, २०१७ च्या चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना, तसेच २०१५ आणि २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना, हे बाद फेरीचे सर्व सामने भारतीय संघाने गमावले. 

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक हुडा.

इंग्लंडचा संघ- जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स, मार्क वूड.

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु होणाऱ्या सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून सुरु होणार आहे.  स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या) वाहिन्यांवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सामन्याचा लाइव्ह धावफलक, बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 india vs england 2nd semifinal squad key players to watch out for when and where to watch scsg