सिडनी : सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर थरारक विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून गुरुवारी ट्वेन्टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्यांचा तुलनेने दुबळ्या नेदरलँड्सशी सामना होईल. ‘अव्वल १२’ फेरीच्या या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ घालवण्याची उत्तम संधी आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत आपल्या मोहिमेची यशस्वी सुरुवात केली. या सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहलीने भारतीय संघातील आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भारतीय संघ अडचणीत असताना आणि सामना हातून निसटणार अशी स्थिती असताना दडपणाखाली कोहलीने ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. परंतु त्याला आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही.
हेही वाचा >>> T20 World Cup: ‘पाश्चात्य देशांच्या पाहुणचाराच्या…’ सिडनीमध्ये भारतीय खेळाडूंना थंड जेवण दिल्याने वीरेंद्र सेहवाग संतापला
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल (४), कर्णधार रोहित शर्मा (४) आणि सूर्यकुमार यादव (१५) हे भारताच्या अव्वल चारपैकी तीन फलंदाज झटपट माघारी परतले. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण आले. परंतु नेदरलँड्सविरुद्ध आपली कामगिरी उंचावण्याची त्यांना संधी मिळेल. नेदरलँड्सकडे पॉल व्हॅन मीकरेन, फ्रेड क्लासन, बास डी लिडे, टीम प्रिंगल आणि रूलॉफ व्हॅन डर मर्व यांसारखे चांगले गोलंदाज आहेत. त्यांनी या विश्व्चषकातील प्राथमिक फेरीत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे या गोलंदाजांविरुद्ध धावा केल्यास भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावेल.
दुसरीकडे, नेदरलँड्सचा संघ धक्कादायक निकाल नोंदवण्याच्या हेतूने मैदानावर उतरेल. नेदरलँड्सने प्राथमिक फेरीचा अडथळा पार करून ‘अव्वल १२’ फेरीत प्रवेश मिळवला. मात्र, या फेरीच्या पहिल्या सामन्यात त्यांना बांगलादेशकडून निसटता पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते विजयी पुनरागमनासाठी उत्सुक असतील.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्व्र कुमार मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, हर्षल पटेल.
नेदरलँड्स: स्कॉट एडवर्डस (कर्णधार/यष्टीरक्षक), कॉलिन एकरमन, टॉम कूपर, बास डी लीडे, ब्रँडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासन, स्टीफन मेबर्ग, विक्रमजीत सिंग, तेजा निदिमानुरु, मॅक्स ओ’डाउड, टीम प्रिंगल, रूलॉफ व्हॅन डर मर्व, टीम व्हॅन गुगटेन, लोगन व्हॅन बीक, पॉल व्हॅन मीकरेन, शरीझ अहमद.
* वेळ : दु. १२.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)
गोलंदाजांच्या उत्तरार्धातील कामगिरीवर लक्ष
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी, विशेषत: अर्शदीप सिंगने सुरुवातीच्या षटकांत अप्रतिम गोलंदाजी केली. डावखुऱ्या अर्शदीपने पाकिस्तानचे दोन्ही प्रमुख फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना माघारी पाठवले. तसेच भुवनेश्व्र कुमार आणि मोहम्मद शमी यांनीही चेंडू स्विंग केला. परंतु अखेरच्या षटकांत पाकिस्तानच्या फलंदाजांनी फटकेबाजी केली. त्यामुळे पुन्हा भारतीय गोलंदाजांच्या डावाच्या उत्तरार्धातील कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेदरलँड्सविरुद्ध अर्शदीप, भुवनेश्वर शमी आणि हार्दिक पंडय़ा हे अखेरच्या षटकांत अधिक चांगला मारा करण्याचा प्रयत्न करतील. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे पुन्हा फिरकीची धुरा सांभाळणे अपेक्षित आहे. परंतु यजुर्वेंद्र चहलला संधी देण्याचाही भारतीय संघ विचार करू शकेल.