मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी२० विश्वचषक सुपर-१२ च्या ग्रुप बी मधील टीम इंडियाच्या शेवटच्या सामन्यात भारताचा स्फोटक स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट गर्जत आहे. मेलबर्नच्या या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर त्याने झिम्बाब्वेविरुद्ध चौकार आणि षटकारांची बरसात करताना अवघ्या २५ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने या मोठ्या मैदानावर ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. त्याचवेळी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचे जोरदार कौतुक केले आहे.
राहुल द्रविडने केली सुर्यकुमारची स्तुती
झिम्बाब्वेवर भारताच्या ७१ धावांनी विजय मिळविल्यानंतर द्रविड म्हणाला, “मला वाटते की त्याने आमच्यासाठी अपवादात्मक कामगिरी केली आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणे आनंददायक आहे. तो अशा फॉर्ममध्ये असताना त्याला पाहणे खूप आनंददायी आहे. प्रत्येक वेळी तो मनोरंजनासाठी खाली आला आहे असे दिसते आणि यात शंका नाही. त्यामुळे तो सध्या टी२० मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे.”
राहुल द्रविड म्हणाला, “तो आता ज्या उंचीवर आहे तिथे त्याचा स्ट्राइक रेट कायम राखणे हे सोपे काम नाही. त्यामुळे तो ज्याप्रकारे फलंदाजी करतोय ते अप्रतिम आहे. त्याची रणनीती त्याच्या प्रक्रियेबद्दल स्पष्ट आहे. “त्याने खूप मेहनत घेतली आहे. सुर्याची एक खुबी आहे ती म्हणजे तो त्याच्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतो आणि कठोर सराव करतो. तो त्याच्या खेळाकडे आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. गेल्या दोन वर्षात मैदानावर आणि मैदानाबाहेर केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळत आहे.
अश्विननेही सुर्यकुमारचे कौतुक केले
भारतीय संघातील वरिष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही सुर्यकुमारचे कौतुक केले. अश्विन म्हणाला, “सूर्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे ते आश्चर्यकारक आहे. तो अजूनही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच आहे आणि व्यक्त होत आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, तो संघातील इतर फलंदाजांनाही त्याच्या या खेळीने प्रोत्साहित करतो. त्याच्या फलंदाजातील फटके हे वाखाणण्याजोगे असल्याने तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो.