आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज न्यूझीलंडविरुद्ध आयर्लंड सामना सुरु आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी महत्वाच्या असणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत १८५ धावा केल्या. आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो त्यांना महागात पडला. आयर्लंडला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान असणार आहे आणि हे आव्हान न्यूझीलंडची गोलंदाजी पाहता फार सोपे असणार नाही.
या सामन्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटिलने कमाल गोलंदाजी करत हॅटट्रिक घेतली. या विश्वचषकातील ही दुसरी हॅटट्रिक केली. १८व्या षटकात त्याने केन विलियम्सन, जिमी निशम आणि सेंटनर यांना एकापाठोपाठ बाद केले. त्याच्या या हॅटट्रिकने न्यूझीलंडला २०० धावांच्या आत रोखण्यास मदत केली. कर्णधार केन विलियम्सन एकमेव अर्धशतकवीरला त्याने बाद करत आयर्लंडला ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्यानंतर निशम आणि सेंटनर या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना त्याने पायचीत करत बाद केले.
न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर जोश लिटिलने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “विलियम्सनला बाद केल्यानंतर तळाच्या फलंदाज खेळण्यासाठी उतरले होते. आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच मी माझी रणनीती आखली आणि नशिबाने मला साथ दिली. आधी शॉट बॉलवर कर्णधार विलियम्सनची विकेट घेतली. आणि अजून विकेट मिळण्याच्या आमिषाने मी फुललेंथ गोलंदाजी केली. ज्यावर मी ही हॅटट्रिक साधली. आमच्या फलंदाजांनी जर सर्वोत्कृष्ट फलंदाजी तर या विश्वचषकातील आणखी एक अपसेट पाहायला मिळू शकतो.”
एका कॅलेंडर वर्षात टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जोश लिटल अव्वलस्थानी आहे.
३९ जोश लिटल (२०२२)
३८ संदीप लामिछाने (२०२२)
३६ वानिंदु हसरंगा (२०२१)
३६ तबरियाझ शम्सी (२०२१)
३५ दिनेश नाकर्णी (२०२१)
३५ भुवनेश्वर कुमार (२०२२)