यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्याच्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग आहे, परंतु अद्याप त्याला प्लेइंग-११ इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे सुपर-१२ च्या चारही सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने ऋषभ पंतच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऋषभ पंतला यष्टिरक्षक म्हणून प्राधान्य द्यायला हवे आणि त्याने टी२० विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात खेळवले पाहिजे, असे मत इयान चॅपेलचे आहे.
इयान चॅपेलने टीम डेव्हिडच्या ऑस्ट्रेलियन टी२० विश्वचषक संघातील समावेशाची तुलना भारतीय संघाशी केली. चॅपल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले, “टिम डेव्हिडने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय केले आहे? कधीकधी, निवडकर्ते घरच्या फॉर्मच्या आधारावर खेळाडूंची निवड करतात आणि याचे उत्तम उदाहरण टीम डेव्हिड आहे. माझ्यामते भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतच्या ऐवजी दिनेश कार्तिकची निवड करणे खूपच हास्यास्पद आहे. प्रत्येक सामन्यात ऋषभ पंत असलाचं पाहिजे, हाच ट्रेंड आहे.”
कार्तिकची कामगिरी काही विशेष नाही
सध्याच्या टी२० विश्वचषकात दिनेश कार्तिकची कामगिरी फार काही म्हणावी तशी झाली नाही, पण भारतीय संघ व्यवस्थापनाला प्लेइंग-११ मध्ये फारसा बदल करायचा नाही, त्यामुळे कदाचित कार्तिकला पाठीशी घातले जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कार्तिकने १ धावा काढली, तर नेदरलँडविरुद्ध त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. यानंतर कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ आणि बांगलादेशविरुद्ध ७ धावांचे योगदान दिले. म्हणजेच कार्तिकच्या बॅटमधून केवळ १४ धावा निघाल्या आहेत.
कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांनाही एकाच वेळी खेळवणे अशक्य आहे. कारण भारत पाच गोलंदाजांसह जाऊ शकणार नाही आणि हार्दिक पांड्याला चार षटके टाकणे अनिवार्य ठरते. हार्दिक पांड्याने अलीकडच्या काळात त्याच्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. परंतु भूतकाळात त्याला पाठीच्या दुखापतीने झगडावे लागले होते. भारताला नेहमीच त्याला सहावा गोलंदाज म्हणून खेळवायचे आहे.