टी२० विश्वचषक २०२२ सुरू झाला असून यावेळी संघ सराव सामने खेळत आहेत. पण, यादरम्यान इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज रिस टोप्ले दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचे या स्पर्धेत न खेळणे इंग्लिश संघासाठी मोठे नुकसान ठरू शकते. कारण, यावेळी तो त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता. याचा संघाला फायदा झाला असता.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सराव सामन्यापूर्वी रिस टोप्लेला दुखापत झाली होती. सामन्यापूर्वी, त्याचा पाय सीमारेषेवर घासला गेला, ज्यामुळे त्याच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याचा घोटा वळला होता. या कारणास्तव पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांनी गोलंदाजी केली पण रीस टोपलीने दुखापतीमुळे सामन्यात भाग घेतला नाही. पण, आता असे वृत्त आहे की दुखापतीमुळे तो संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर पडला.
त्याचवेळी, रिस टोप्लेच्या जागी इंग्लंडकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, टी२० विश्वचषकात त्यांच्या जागी टायमल मिल्स किंवा रिचर्ड ग्लीसन यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रिस टोप्लेने या वर्षी भारताविरुद्धच्या एकदिवसीयमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याने भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या ४६ धावांत ६ बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडला १०० धावांनी मोठा विजय मिळाला. ही इंग्लंडची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी ठरली. यापूर्वी पॉल कॉलिंगवूडने बांगलादेशविरुद्ध ६/३१ अशी गोलंदाजी केली होती.
टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टोप्लेने द हंड्रेड स्पर्धेतूनही माघार घेतली होती. त्याने द हंड्रेडच्या मागच्या हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतकर माघार घेतली होती. असे असले तरी, त्याला विश्वचषकाच्या तोंडावर दुखापत झाली आणि या स्पर्धेत आता तो खेळणार नाहीये. इंग्लंडला विश्वचषकातील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध २२ ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे.