ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु झालेल्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने यूएईवर रोमांचक विजय मिळवला. हा सामना नेदरलँड्स संघाने ३ गडी राखून आपल्या खिशात घातला आणि विश्वचषकात विजयी सुरुवात केली. रविवारी (१६ ऑक्टोबर) जिलॉन्ग येथे झालेल्या सामन्यात यूएईने नेदरलँड्ससमोर ११२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने २० व्या षटकात लक्ष्य गाठले.
नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना मॅक्स ओडोड याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने १८ चेंडूंचा सामना करताना २३ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ३ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन ऍकरमन याने १७ धावा, स्कॉट एडवर्ड्स १६ धावांवर नाबाद राहिला, टीम प्रिंगलने आणि बॅस डी लीड्स याने अनुक्रमे १५आणि १४ धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. मात्र, तरीही संघाने शानदार विजय मिळवला.
तत्पूर्वी, यूएईच्या कर्णधाराने येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूएईने संथ पण दमदार सुरुवात केली. सलामीवीर चिराग सुरी २० चेंडूत १२ धावा करून वॅन डर मर्वेचा बळी ठरला. ३३ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर सलामीवीर मोहम्मद वसीम (४१) सोबत काशिफ दाऊद (१५) यांनी डाव पुढे नेला. यानंतर वृत्त अरविंदनेही २१ चेंडूत १८ धावांची खेळी केली. या चार फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला पण सर्वांनी केलेल्या धावांपेक्षा जास्त चेंडू खेळले. याचा परिणाम असा झाला की संघाचा धावगती सर्वकाळ ६ च्या वर जाऊ शकला नाही.
इतर फलंदाज काही धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. जवर फरीद (२), बासील हमीद (४), कॅप्टन रिझवान (१) आणि अयान अफजल खान (५) विशेष काही दाखवू शकले नाहीत. यूएईचा संपूर्ण संघ निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून केवळ १११ धावाच करू शकला. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने ३ आणि फ्रेड क्लासेनने २ बळी घेतले. टीम प्रिंगल आणि रॉल्फने प्रत्येकी एक गडी बाद केला.