आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज न्यूझीलंडविरुद्ध आयर्लंड सामना झाला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी महत्वाच्या असणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत १८५ धावा केल्या. आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो त्यांना महागात पडला. न्यूझीलंडने आयर्लंडवर ३५ धावांनी विजय मिळवत टी२० विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला आहे. अर्धशतकी खेळी करणारा केन विलियम्सनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आयर्लंडने धावांचा पाठलाग करताना सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्नी यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यांनी आठ षटकात ६८ धावांची शानदार सलामी भागीदारी केली. त्यांनी अनुक्रमे २७ चेंडूत ३७ आणि २५ चेंडूत ३० धावा केल्या. बाकी कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी आयर्लंडच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यांनी ठराविक अंतराने गडी बाद करत संघाला विजयापर्यंत नेले. न्यूझीलंडकडून लॅाकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याने ४ षटकात २२ धावा दिल्या. मिशेल सेंटनर, ईश सोढी आणि टीम साउदीने प्रत्येकी दोन गडी बाद करत त्याला साथ दिली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडची सुरुवात फार खराब झाली.पहिल्या तीन षटकातच त्यांनी दोन गडी गमावले होते. १२व्या षटकात डेलनीने डेव्हॉन कॉनवेला मार्क एडेरकरवी झेलबाद केले. त्याने ३३ चेंडूत २२ धावा केल्या. कॉनवेने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. यानंतर १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेलेनीने ग्लेन फिलिप्सला डॉकरेलकरवी झेलबाद केले. फिलिप्स नऊ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला. फिलिप्सने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. १४ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११८ अशी स्थिती होती. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनने डेल मिशेल सोबत ६० धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विलियम्सनने ३५ चेंडूत ६१ धावा केल्या. तर मिशेलने २१ चेंडूत ३१ धावा केल्या.
जोश लिटिलने कमाल गोलंदाजी करत या विश्वचषकातील दुसरी हॅटट्रिक केली. १८व्या षटकात त्याने केन विलियम्सन, जिमी निशम आणि सेंटनर यांना एकापाठोपाठ बाद केले. त्याने ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. गॅरेथ डेलेनीने ४ षटकात ३० धावा देत २ गडी बाद केले. तर मार्क एडेअर १ गडी बाद करत त्यांना साथ दिली.
उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या दृष्टीने हा सामना न्यूझीलंडसाठी खूप महत्त्वाचा होता. हा सामना जिंकत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पोहचणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे. आयर्लंड संघाचे आधीच या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.