टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. यामधील पहिला सामना गट १ मध्ये सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात खेळला जात आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले आहे.
तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी किवी संघ आज मैदानात उतरला आहे. किवी संघाकडून सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेने सर्वाधिक नाबाद ९२ धावा केल्या.
त्याने ५८ चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. कॉनवेशिवाय फिन ऍलनने १६ चेंडूत ४२ आणि जेम्स नीशमने १३ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने २३ आणि ग्लेन फिलिप्सने १२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन आणि अॅडम झाम्पाने एक विकेट घेतली.