रविवारी (२३ ऑक्टोबर) भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने सराव सत्रात भाग घेतला. गोलंदाज आणि फलंदाजांनी नेटमध्ये जोरदार सराव केला. मात्र, सरावाच्या वेळी पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद जखमी झाला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शुक्रवारी नेट सत्रादरम्यान टॉप ऑर्डरचा फलंदाज शान मसूदच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावर आता पीसीबीने महत्वाची अपडेट दिली आहे.

मोहम्मद नवाजच्या बॅटमधून निघालेल्या शॉटमुळे मसूदला ही दुखापत झाली. मसूद नेटवर फलंदाजीचा सराव करण्यासाठी त्याच्या पाळीची वाट पाहत होता आणि त्यावेळी त्याने हेल्मेटही घातले नव्हते. सरावादरम्यान नवाजने स्पिनरविरुद्ध उंच शॉट मारला आणि चेंडू ३३ वर्षीय मसूदच्या डोक्याला लागला. त्याला खुप वेदना होत असल्याने टीम डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्पुरते उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

हेही वाचा – T20 World Cup 2022: भारत-पाक सामन्यासाठी गौतम गंभीरने निवडली प्लेइंग इलेव्हन, दिनेश कार्तिकला दिला डच्चू, जाणून घ्या कारण

शान मसूदचे सर्व न्यूरोलॉजिकल रिपोर्ट नॉर्मल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मसूदच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पुष्टी केली की, मेलबर्नमधील नेट सत्रादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यानंतर हा स्टार फलंदाज गंभीर दुखापतीतून वाचला आहे. “शान मसूदचे सर्व न्यूरोलॉजिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्याच्या सीटी स्कॅनमध्ये फक्त वरवरची दुखापत दिसून येते, जिथे चेंडू त्याला लागला,” असे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे. पीसीबीने पुष्टी केली आहे की, शनिवारी मसूदची पुन्हा एकदा कनकशन चाचणी केली जाईल.

एकादश संघात मसूदचे स्थान संशयाच्या भोवऱ्यात –

या घटनेनंतर, रविवारी भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्यासाठी पाकिस्तानच्या एकादश संघात मसूदचे स्थान संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांच्या खेळाची परिस्थिती चाचणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत फखर जमान आघाडीवर आहे. बाबर आणि रिझवान बाद झाल्यानंतर मसूद फलंदाजीला उतरतो. न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेत तो याच क्रमांकारव खेळला होता.

Story img Loader