रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर अजून ही मोहम्मद नवाजने शेवटच्या षटकात टाकलेल्या वाई़ड चेंडूंची चर्चा होत आहे. आता या वाईड चेंडूवर रविचंद्रन अश्विनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला, ”जर तो चेंडू वाईड गेला नसता, तर त्याने थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन निवृत्ती जाहीर केली असती.”
खरे तर भारतीय संघाला शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना, दिनेश कार्तिक यष्टीचीत झाला. त्यामुळे आता भारताला एका चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर होता. अश्विनने बरीच हुशारी दाखवत, लेग-साइडच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूला छेडछाड केली नाही आणि तो चेंडू वाईड गेला. यानंतर त्याने शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
रविचंद्रन अश्विनने ज्या प्रकारे नवाजचा चेंडू सोडला आणि त्याला वाईड केले, त्यामुळे त्याचे खूप कौतुक केले जात आहे. कारण यामुळे सामना बरोबरीत आला आणि भारतीय संघावरील दडपण दूर झाले. हृषिकेश कानिटकर यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अश्विनने त्या वाइड चेंडूवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”जर नवाजचा चेंडू वळला असता आणि माझ्या पॅडवर आदळला असता, तर मी थेट ड्रेसिंग रूममध्ये गेलो असतो आणि ट्विटरवर लिहिले असते, ‘धन्यवाद, माझी क्रिकेटची कारकीर्द अप्रतिम होती आणि तुम्हा सर्वांचे आभार.”
रविचंद्रन अश्विनने याआधी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेवटच्या चेंडूवर त्याच्या मनात काय चालले होते हे सांगितले होते. त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ”चेंडू लेग साइडला जाताना पाहताच मी तो सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो वाइड झाला. वाइड्समधून धावा मिळताच मी एकदम रिलॅक्स झालो.”