बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १०६ धावांनी बांगलादेशवर मात केली. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात स्टार फलंदाज रिले रोसोने महत्वाची भूमिका निभावली. त्याने आपल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा विजय सोप्पा केला.
त्याने हे शतक अवघ्या ५२ चेंडूत पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकार मारले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ५६ चेंडूत १०९ धावा केल्या होत्या. त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने नुकतेच भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते.
रिले रोसोने या अगोदर इंदौर येथे भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात शतक झळकावले होते. ४८ चेंडूत शतक झळकावणाऱ्या पोटियाजच्या या फलंदाजाने सामन्याला कलाटणी दिली. परिणामी भारताला ४९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, याआधी तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी टी-२० सामन्यांमध्ये रिले रोसो फ्लॉप ठरला होता आणि त्याला आपले खातेही उघडता आले नव्हते. परंतु पाच वर्षांहून अधिक प्रतीक्षेनंतर रोसो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. तसेच तो आता सुपर फॉर्ममध्ये आहे.
रिले रोसो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्णवेळ सदस्य असेलल्या देशांतील सलग दोन शतके झळकावणार पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने भारतानंतर बांगलादेश विरुद्ध शतक झळकावत ही किमया साधली. रोसोच्या अगोरदर हा विक्रम फ्रांसचा फलंदाज गुस्ताव मॅकनॉन याच्या नावावर होता. त्याने देखील सलग दोन टी-२० सामन्यात शतकं झळकावली होती.