टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला. पण गोलंदाजीत चांगली कामगिरी करणारा सॅम करन हाच खरा विजयाचा शिल्पकार ठरला.
संपूर्ण टी२० विश्वचषकात इंग्लंडचा डावखुरा गोलंदाज सॅम करनने शानदार कामगिरी केली. त्याने या विश्वचषकात तब्बल १३ गडी बाद केले म्हणून त्याला सामनावीराच्या पुरस्कारसोबतच मालिकाविराच्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. पॉवर प्ले सर्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सॅम करनने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीला खेळपट्टीवर तग धरू दिले नाही. त्याने ४ षटकात फक्त १२ धावा देत पाकिस्तानचे ३ फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने २२ धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही २ बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने ३२ धावा केल्या.