भारत आणि बांगलादेश संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३४ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, बांगलादेशला १८५ धावांचे लक्ष्य दिले आहे. या दरम्यान तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा एक झेल हसन महमूदकडून सुटला, तेव्हा तस्कीन अहमद त्याच्यावर भडकला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियवर व्हायरल होत आहे.
भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली. तस्किन अहमदच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने पुल शॉट खेळला. चेंडू थेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या हसन महमूदच्या दिशेने गेला. हा एक सोपा झेल होऊ शकला असता, पण हसनने सर्वांची निराशा करत हा झेल सोडला. हे सर्व पाहून तस्किनला खूप राग आला आणि तो खूप रागावलेला दिसत होता.
हसन महमूदने चूक सुधारली –
बांगलादेशच्या गोलंदाजाची चूक खूप महागात पडू शकत होती. परंतु हसन मेहसूदने पुढच्याच षटकात आपली चूक सुधारली. या बांगलादेशी गोलंदाजाने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हिटमॅनला आणि यासिर अलीकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. येथे हसनने रोहितची विकेट तर घेतलीच, पण तस्किन अहमदलाही उत्तर दिले.
खराब फॉर्ममध्ये आहे हिटमॅन –
हिटमॅन रोहित शर्मासाठी टी-२० वर्ल्ड कप २०२२ काही खास ठरला नाही. रोहितची आतापर्यंतच्या स्पर्धेतील आकडेवारी खूपच मध्यम आहे. भारतीय कर्णधार रोहितने नेदरलँड्सविरुद्ध २९ चेंडूत ५३ धावा केल्या होत्या, मात्र याशिवाय त्याने तीन सामन्यांत ४, १५ आणि २ धावा केल्या आहेत. त्याने ४ सामन्यात फक्त ७४ धावा केल्या आहेत. हे आकडे हिटमॅनचे खराब कामगिरी अधोरेखित करतात.