१६ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली असून पात्रता फेरीतील सामने आणि सराव सामने या आठवड्यात खेळले जात आहेत. सुपर-१२चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून २३ तारखेला भारत वि पाकिस्तान सामन्याने टीम इंडियाची सुरुवात होणार आहे. पण यादरम्यान वेगवेगळ्या संघांचे सराव सामने खेळले जात होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळणार होता मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला.

टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज टीम इंडियाचा न्यूझीलंडबरोबर दुसरा सराव सामना होणार होता पण धुव्वाधार पावसामुळे सामना होऊ शकला नाही. ब्रिस्बेनमध्ये नाणेफेकही न होता सामना रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियावरील रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघ आज टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा सराव सामन्यात मुकाबला करणार होता. डेथ ओव्हरमधील चुका सुधारण्यासाठी संधी आजच्या सामन्यात भारताकडे होती, परंतु पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे भारत-न्यूझीलंड हा सराव सामना रद्द करावा लागला. आता भारतीय संघ थेट २३ ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना करणार आहे आणि त्यात डेथ ओव्हरमधील चूका कायम राहिल्यास रोहित अँड कंपनीला महागात पडू शकते.

तत्पूर्वी, भारत-न्यूझीलंड सामन्याआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना त्याच मैदानावर सुरु असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि सामना मध्येच थांबविण्यात आला. पाऊस खूप वेळ सुरु असण्याने शेवटी तो ही सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने २० षटकात १५४ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानसाठी कर्णधार मोहम्मद नबी याने ५१ धावांची शानदार खेळी केली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने २ बळी मिळवले. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, संघाच्या १९ धावा झालेल्या असताना पाऊस आल्यानंतर खेळ थांबवण्यात आला. पावसाने उघडीप न घेतल्याने ‌ अखेर सामना रद्द केला गेला.

याव्यतिरिक्त दिवसातील आणखी एक सराव सामना बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान होणार होता. परंतु, त्या सामन्यातही पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. ‌‌मुख्य फेरीचा सामन्यांना २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Story img Loader