टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी (दि. ०६ नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात या स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना भारताच्या पारड्यात पडला. या विजयासह भारताने उपांत्य सामन्यात धडक तर दिलीच, पण त्याचसोबत कर्णधार रोहितचा फॉर्म आणि युजवेंद्र चहल यांच्या बद्दल भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने मत व्यक्त केले आहे.
आकाश चोप्रा रोहित शर्माच्या फॉर्म संदर्भात म्हणतो की, “इंग्लंडविरुद्ध भारताला कर्णधार रोहित शर्माचे फॉर्ममध्ये येण्याचे गरजेचे आहे. पॉवर प्ले ओव्हर्समध्ये त्यांना अधिक आक्रमक दृष्टिकोन देखील आवश्यक असेल. रोहितचा फॉर्म हा भारतीय संघासाठी खूप मोठा चिंतेचा विषय आहे. कदाचित कर्णधारपदाच्या दबावात तो मोठी खेळी करू शकत नसेल. मात्र त्याने मुक्तपणे फटके मारत कुठलाही विचार न करता फलंदाजी करणे आवश्यक आहे.”
तसेच समालोचक चोप्रा पुढे युजवेंद्र चहल संदर्भात म्हणाला की, “इंग्लंडविरुद्ध भारताला चहलची गरज असेल. पॉवर प्ले षटकांमध्ये तो फिरकी गोलंदाजी करून इंग्लंडच्या फलंदाजांना हवा असणारा वेग कमी करू शकतो. तसेच ऑस्ट्रेलियातील मैदाने ही देखील खूप मोठी असल्याने तिथे भारताला त्याचा गुगली खूप महत्त्वाचा ठरू शकतो. अश्विनने आजचा सामना सोडला तर मागे फारशी चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे मला चहलचा पर्याय योग्य वाटतो. अॅडलेड ओव्हल मैदानावरील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळते.”
उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हल मैदानावर १० तारखेला होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत थेट अंतिम फेरीत पोहचेल. भारताचा अॅडलेड मैदानावरचा इतिहास अतिशय चांगला आहे. त्यामुळे इंग्लंडला याची नक्कीच जाणीव असणार हे निश्चित.