एक काळ असा होता जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा पाहायला मिळत होता, पण गेल्या काही वर्षात किंग कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, मात्र ऑक्टोबर २०२२ या महिन्यात विराट कोहलीचे नशीबचं बदलले. तो कुठल्याही मैदानावर त्याला हवी तशी खेळी करताना दिसत आहे. त्यामुळेच विराट कोहलीला दीर्घ काळानंतर आयसीसीकडून हा पुरस्कार देण्यात आला. विराटला ऑक्टोबर २०२२ साठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुरुष आणि महिला खेळाडूंची घोषणा केली. पुरुष गटात विराट कोहली आणि महिला गटात पाकिस्तानच्या निदा दारला महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात विराट कोहलीने खूप धावा केल्या. गेल्या महिन्यात विराटने चार सामन्यांत २ अर्धशतके झळकावली, त्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेली खेळी ही विशेष होती.
विराट कोहलीला क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ऑक्टोबर २०२२ साठी आयसीसी पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. शेवटी किंग कोहलीने दोन्ही खेळाडूंना मागे टाकत प्लेअर ऑफ द मंथचा किताब पटकावला. ऑक्टोबर महिन्यात कोहलीला फक्त ४ डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी केली, ज्याला त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हटले होते. त्याची ही खेळी वाखाणण्याजोगी होती.
महिला क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानने मारली बाजी
पाकिस्तानच्या निदा दार हिने भारताचे जेमीमा रोड्रिग्ज आणि दीप्ति शर्मा यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. निदाने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या महिलांच्या आशिया चषकात ६ सामन्यात १४५ धावा केल्या त्याचबरोबर ८ बळी तिने घेतले होते.