रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील चौथा सामना पार पडला. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने मात केली. या सामन्यात भारताकडून विजयात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी मोलाचा वाटा उचलला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी भली मोठी भागीदारी उभारली. त्याचबरोबर दोघांनी भागीदारीचा एक नवीन विक्रम रचला.
विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी रविवारी पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करून टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला. यापूर्वीचा विक्रम महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये ९७ धावांची भागीदारी केली होती.
विराटने ५३ चेंडूंचा सामना करताना, ६ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या. त्याचबरोबर हार्दिका पांड्याने देखील त्याला योग्य साथ देताना ३७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० धावांचे योगदान दिले. ज्यामुळे भारतीय संघाचा विजय सोपा झाला.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्ताने संघान प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १५९ धावा केल्या होत्या. तसेच भारतीय संघाला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ६ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.