टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात आज होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर सामना झाला. या सामन्यातील विजेता २०२२ च्या टी२० विश्वचषकातील सुपर-१२ मध्ये पोहोचणार असल्याने वेस्ट इंडीज च्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. मात्र वेस्ट इंडिज संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. दोनवेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज आयर्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे अनेक चाहत्यांकडून वेस्ट इंडीजचा संघ टीकेचा धनी होताना दिसत आहे.

टी२० विश्वचषकाच्या ११व्या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयासह आयर्लंडचा संघ टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघाची मोठी निराशा झाली असून तो या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वेस्ट इंडीज संघ ट्रोलिंग होताना दिसत आहे. यावर अनेकांनी तर मजेशीर मीम्स तयार केले आहेत. तसेच क्रिकेट जगतातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

वेस्ट इंडिजचा प्रमुख खेळाडू शिमरन हेटमायर संघात सामील होऊ शकला नाही. कारण त्याला विमानतळावर दोन्ही वेळेस यायला उशीर झाला आणि त्यामुळे तो वेस्ट इंडीज संघात सामील होऊ शकला नाही. संघ त्याला तिथेच सोडून निघून गेला यावर आता मीम्स तयार होत असून अजूनही तो संघांची विमानतळावर वाट बघत आहे, अशाप्रकारच्या काही कमेंट्स चाहत्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत. एकाने तर असं लिहिले आहे की,”हम सिर्फ आयपीएल जीतते हे.”

वेस्ट इंडिजने आयर्लंडसमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विंडीज संघाकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक ६२ धावांची खेळी खेळली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने चार षटकांत १६ धावांत ४ फलंदाज बाद केले. धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या आर्यलंडने ४.२ षटकातच ५० धावा केल्या. त्यांचा कर्णधार-सलामीवीर अँड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या गड्यासाठी ४५ चेंडूत ७३ धावांची भागीदारी रचली. बालबर्नीने २३ चेंडूत ३७ धावा केल्या. तसेच स्टर्लिंगने ३२ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत ४८ चेंडूत ६६ धावा केल्या.

२०२२ चा विश्वचषक हा काही संघांसाठी चांगला गेला तर काहींसाठी वाईट. पण दोनवेळची वेस्ट इंडीजसाठी ही खूप मोठी नामुष्की ठरली आहे.  ज्यांनी २ एकदिवसीय विश्वचषक, एक चॅम्पियन ट्रॉफी आणि दोन टी२० विश्वचषक असे त्यांच्या नावावर असताना हा पराभव खूप मोठा धक्का आहे. वेस्ट इंडीज प्रवास मात्र आज येथेच थांबला आहे, असे मत अनेक माजी दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी व्यक्त केले.

Story img Loader