टी-२० विश्वचषक २०२२ च्या २९ व्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर नेदरलँड्सच्या फलंदाजांनी गुडघे टेकताना ९ बाद ९१ धावा करता केल्या. पाकिस्तानने हे लक्ष्य ४ गडी गमावून पूर्ण केले. सामन्या दरम्यान रिझवान कॉलरला लावलेल्या एका बिल्यामुळे चांगलाच चर्चेत होता.
मात्र, पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी म्हणजे सलामीवीर आणि स्टार यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान फॉर्ममध्ये परतला. रिझवानचे अर्धशतक अवघ्या १ धावेनी हुकले. पण त्याच्या ४९ धावा कोणत्याही मोठ्या खेळीपेक्षा कमी नाहीत. कारण ती पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक धावांची खेळी होती.मात्र, फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणादरम्यानही रिझवान चांगलाच चर्चेत होता. वास्तविक, या सामन्यात रिझवानच्या कॉलरवर एक खास बिल्ला (बॅज) दिसला होता, हा बिल्ला पाहून चाहत्यांना हा बिल्ला का लावला हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
आशिया चषकापूर्वी रिझवान उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने आशिया चषक २०२२ तसेच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत बॅटने चांगली कामगिरी केली होती. ज्यामुळे त्याला सप्टेंबर २०२२ चा प्लेअर ऑफ द मंथचा बहुमान देण्यात आला होता. त्यामुळेच नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रिझवान त्याच्या कॉलरवर आयसीसीने दिलेला हा बिल्ला घालून मैदानात उतरला होता.
रिझवानच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या दहा सामन्यांमध्ये सात अर्धशतके झळकावली, ज्यात आशिया चषक स्पर्धेत हाँगकाँग आणि भारताविरुद्धच्या दोन ७० पेक्षा अधिक धावसंख्येचा समावेश आहे.