टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडला हरवत तर इंग्लंडने भारताला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. पण या दोन्ही संघानाही पावसाची धास्ती वाटत आहे. कारण पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पावसाचा धोका असून ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये ९५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे.
जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह हा आता शिगेला पोहचला असून टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात आहे. जर पावसामुळे सामना १३ तारखेला झाला नाही तर त्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे चाहत्यांना अजून एक दिवस वाट पाहावी लागणार आहे. चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून आयसीसी देखील याची खबरदारी घेणार आहे. रविवारी ८ ते २० मिमी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ९५ टक्के आहे.
मेलबर्नच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार, “१३ तारखेला ढगाळ वातावरण असणार असून १००% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाटी वादळाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्या अहवालात पुढे असे देखील म्हटले आहे की, शक्यतो तीव्र. मध्यम स्वरूपाचे वारे सकाळच्या वेळी उत्तरेकडून ईशान्य दिशेने १५ ते २५ किमी/तास वेगाने जाणार तर दिवसा उत्तरेकडून वायव्येकडे २० ते २५ किमी/तास वेगाने वाऱ्याचा वेग बदलणार आहे.” अशी माहिती तेथील हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी दिली आहे.
ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषक २०२२ हा पावसामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. सुपर-१२ मधील चार सामने हे पावसामुळे रद्द करण्यात आले होते. तर इतर दोन सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार निकाल जाहीर करावा लागला होता. यावर बऱ्याच माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला असल्याने चिंतेचे काही कारण नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.