T20 World Cup 2024 Super 8 Scenario: टी-२० विश्वचषक २०२४ मधील रोमांच दिवसागणिक वाढत जात आहे. स्पर्धेचा पुढचा टप्पा म्हणजेच सुपर-8 गाठण्याचे समीकरण दिवसेंदिवस अटीतटीचं होतं चाललं आहे. या स्पर्धेतील छोटे संघ आपल्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकत आहेत. त्याचबरोबर माजी चॅम्पियन संघांना स्पर्धेतून बाहेर जाण्याचा धोका आहे. टी-२० विश्वचषकात रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. पण अँटिग्वाच्या नॉर्थ साऊंडमध्ये आणखी एक सामना खेळवला जात होता. ओमानचा सामना स्कॉटलंडशी होता. स्कॉटलंडने हा सामना जिंकला. या पराभवासह ओमान स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला देश ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना ओमानने ७ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या. स्कॉटलंडने हा सामना ७ गडी राखून सहज जिंकला. स्कॉटलंडचा तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. ओमान-स्कॉटलंडमधील सामन्यानंतर सर्वात मोठा तणाव गतविजेत्या इंग्लंडसमोर आहे. स्कॉटलंडच्या गटात ओमान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि नामिबिया हे संघ आहेत. स्कॉटलंड संघाचा इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. तर ओमानविरूद्धचा सामना स्कॉटलंडने १४व्या षटकात जिंकला म्हणजे स्कॉटलंडचा नेट रन रेट आता +२.१६४ झाला. त्यांचेही ३ सामन्यात ५ गुण आहेत. इंग्लंडचे दोन सामन्यांत एक गुण आहे आणि नेट रन रेट -१.८०० आहे.
म्हणजेच ब गटात आता स्कॉटलंडचा संघ ५ गुणांसह पहिल्या स्थानी आहे आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नामिबिया २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंड १ गुणासह चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडचे अजूनही नामिबिया आणि ओमानविरूद्ध सामने बाकी आहेत. इंग्लंडला त्यांचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तरच त्यांना सुपर८ मध्ये जाण्याची संधी मिळू शकते तर स्कॉटलंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तरीही इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल.
The pressure is on England! https://t.co/Pm8QwEBe78 #T20WorldCup pic.twitter.com/MZloFduDYL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 10, 2024
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
इंग्लंडवर टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचा धोका
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. इंग्लंडचे अजून २ सामने बाकी आहेत. हा सामना ओमान आणि नामिबियाविरुद्ध होणार आहे. इंग्लंडसाठी अडचण अशी आहे की, त्यांना हे दोन्ही सामने जिंकावे लागतीलच शिवाय त्यांचा नेट रन रेटही सुधारावा लागेल. इंग्लंडचा नेट रन रेट सध्या -१.८ आहे. या गटातील अव्वल २ संघ सुपर८ मध्ये प्रवेश करतील. ऑस्ट्रेलियाने आपले दोन्ही सामने जिंकले असून त्यांचे पुढील दोन सामने नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध होणार आहेत.
ऑस्ट्रेलियाने एकही सामना जिंकला तर ते सुपर८ मध्ये प्रवेश जातील. सुपर८ मध्ये पोहोचण्यासाठी स्कॉटलंड, नामिबिया आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत आहे. तर इंग्लंडला सुपर८ मध्ये पोहोचण्यासाठी ओमान आणि नामिबियाविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. एका पराभवानेही ते स्पर्धेतून बाहेर होऊ शकतात. तसेच इंग्लंडचा कोणताही सामना पावसामुळे रद्द झाला तर ते पुढील फेरीच्या शर्यतीतून बाहेर होतील. इंग्लंडसह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका सारख्या संघावर टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.