आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ च्या या स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी विजय मिळवला. अमेरिकेने पाकिस्तानला विजयासाठी १९ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला एक विकेट गमावून अवघ्या १३ धावाच करता आल्या. अमेरिकेने अशा पद्धतीने या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकला. अमेरिकेच्या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदन केलं जातं आहे. तसंच सौरभ नेत्रावळकरचीही चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपर ओव्हरचा थरार कसा होता?

अमेरिकेने दिलेल्या १९ धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानच्या टीममधले इफ्तिखास अहमद आणि फखर जमान हे दोघेही मैदानात आले. तर अमेरिकेने मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरला सुपर ओव्हरची बॉलिंग दिली. सौरभने पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. सौरभने त्यानंतर वाईड बॉल टाकला. पाकिस्तानला हे वाटत होतं की त्यांच्या धावा होतील. पण सौरभने तिसरा बॉल फेकला तेव्हा इफ्तिकार अहमदचा कॅच नितीश कुमारने सहज घेतला. नितीशने अप्रतिम झेल घेतल्याने इफ्तिकार आऊट झाला. ज्यानंतर शादाब खान मैदानात आला.

शादाब खान आल्यानंतर काय घडलं?

शादाब खान मैदानात आल्यानंतर पाकिस्तानला ३ चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती. सौरभने आणखी एक वाईड टाकल्याने ती १३ धावा विजयासाठी हव्या होत्या. अशातच सौरभच्या चौथ्या चेंडूवर पाकिस्तानने चौकार लगावला. ज्यानंतर २ चेंडूंमध्ये ९ धावा हव्या होत्या. सौरभने पाचव्या चेंडूवर दोन धावा दिल्या. ज्यानंतर एका चेंडूत पाकिस्तानला ७ धावांची गरज होती. सौरभने शेवटचा चेंडू सगळं कौशल्य पणाला लावत फेकला आणि अवघी एक धाव दिली. ज्यानंतर अमेरिकेने इतिहास रचला आणि सौरभच्या शानदार खेळीची आणि सुपर ओव्हरमध्ये काढलेल्या विकेटची चर्चा सुरु झाली.

T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं

पाकिस्तानचं ढिसाळ क्षेत्ररक्षण

त्याआधी यूएसच्या ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंह या जोडीने सुपर ओव्हरमध्ये १८ धावा केल्या. पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद आमिर याने सुपर ओव्हरमध्ये तब्बल ९ बॉल टाकले. आमिरने एकूण ९ बॉलमध्ये अनुक्रमे ४, २, १, १+WD, १, १+WD, १, २+WD आणि १+W अशा १८ धावा अमेरिकेला करता आल्या. पाकिस्तानने सुपर ओव्हरमध्ये शाळकरी मुलांसारखी आणि हास्यास्पद दर्जाची फिल्डिंग केली. त्यामुळे पाकिस्तानला ट्रोल केलं जातं आहे.

सौरभच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानची नांगी

पाकिस्तानद्वारे मोहम्मद आमिरने सुपर ओव्हर टाकायचा निर्णय झाला. पण अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण आणि स्वैर गोलंदाजी यामुळे अमेरिकेच्या फलंदाजांनी १८ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने नांगी टाकली. इफ्तिकारने एक चौकार लगावत आशा पल्लवित केल्या. पण सौरभच्या डोक्यावरून मोठा फटका खेळायचा इफ्तिकारचा प्रयत्न नितीशच्या अफलातून झेलमुळे यशस्वी झाला नाही. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध फलंदाज संघात असतानाही शदाब खानला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. पण सौरभने टिच्चून मारा करत अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2024 usa vs pak united states won by 5 runs in super over against pakistan saurabh netravalkar defended 19 runs scj