When will Team India arrive in India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकली. यासोबतच भारताचा गेल्या १७ वर्षांपासूनचा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा दुष्काळही संपुष्टात आला आहे. यानंतर भारतीय संघ मायदेशी रवाना होणार होता, मात्र बार्बाडोसमधील बेरील चक्रीवादळामुळे हा संघ हॉटेलमध्ये अडकला आहे. सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक निवेदन जारी केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की आम्हाला परतण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. टीम इंडिया लवकरच मायदेशी परतण्यासाठी विमानात बसू शकते.

भारतीय संघ स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी मायदेशी पोहोचू शकतो. तेथील परिस्थितीबाबत माहिती देताना बार्बाडोसचे पीएम मिया मोटली यांनी सांगितले की, बेरील चक्रीवादळामुळे बंद झालेले येथील विमानतळ येत्या सहा ते १२ तासांत पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. बेरील चक्रीवादळामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, सपोर्ट स्टाफ, बीसीसीआयचे काही अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून हॉटेलमध्ये अडकले आहेत.

टीम इंडिया कधी परतणार –

बार्बाडोसचे पंतप्रधान म्हणाले, ‘आम्हाला आशा आहे की विमानसेवा लवकरच पूर्वपदावर आणली जाईल. आमच्याकडे याशिवाय इतरा सांगण्यासारखे काही नाही, परंतु आम्ही विमानतळ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि ते आता त्यांची अंतिम तपासणी करत आहेत. आम्ही लवकरच सर्वकाही सामान्य करू. असे बरेच लोक आहेत ज्यांना काल रात्री उशिरा किंवा आज किंवा उद्या सकाळी निघायचे होते. आमचे विमानसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येत्या सहा ते बारा तासांत विमानतळ सुरू होईल, अशी आशा आहे.

हेही वाचा – VIDEO : एमएस धोनीने कौतुक करताच भारावला रोहित शर्मा; म्हणाला, ‘माही भाई तर…’

टीम इंडिया चार्टर विमानाने येणार –

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही येथे अडकलो आहोत. प्रथम खेळाडू आणि इतर सर्वांना येथून सुरक्षित कसे बाहेर काढायचे ते पाहावे लागेल. त्यानंतर भारतात पोहोचल्यानंतर स्वागत कार्यक्रमाचा विचार करू. जय शाह आणि बोर्डाच्या इतर अधिकाऱ्यांसह टीम चार्टर प्लेनने भारताला रवाना होणार होती, मात्र येथील विमानतळ बंद असल्याने ते शक्य झाले नाही. विश्वचषकाच्या कव्हरेजसाठी आलेल्या भारतीय माध्यमांनाही वादळग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. शाह म्हणाले, ‘आम्ही सोमवारसाठी चार्टर विमान मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, पण विमानतळ बंद असल्याने ते होऊ शकले नाही.’

हेही वाचा – ‘बुमराहची आई १६-१८ तास काम करायची…’, एका पोस्टने उलगडले जसप्रीतच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक क्षण

बेरील चक्रीवादळाने सर्व काही थांबवले –

बेरील चक्रीवादळ बार्बाडोसला धडकल्यानंतर तिथे सर्व काही थांबले. रविवारी रात्री उशिरा ताशी १३० मैल वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे सर्वांचेच हाल झाले. हे श्रेणी ४ चे वादळ बार्बाडोसच्या पूर्व-आग्नेय दिशेने सुमारे ५७० किमी अंतरावर होते. त्यामुळे उड्डाणेही रद्द करावी लागली. मात्र, आता परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा बार्बाडोसच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.