आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ रविवारी पर्थच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा भारतीय रन-मशिन विराट कोहलीवर असतील. कोहली गेल्या दोन सामन्यांत अपराजित राहिला असून तो टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ आणि नेदरलँडविरुद्ध नाबाद ६२ धावांची खेळी केली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामने कोहलीविरुद्ध आपल्या गोलंदाजांनी खास रणनीती आखल्याचे म्हटले आहे. कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज यांच्यातील सामना रोमांचक होईल, असे देखील त्याने सांगितले.

शनिवारी पत्रकार परिषदेत एडन मार्करामने सांगितले की, ” सामना रोमांचक होणार आहे. आमच्या वेगवान गोलंदाजांना त्याला (विराट कोहली) गोलंदाजी करायला आवडते. त्याचा फॉर्म परत आला आहे, पण आमचे गोलंदाजही सध्या चांगली कामगिरी करत आहेत.”

हेही वाचा – T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डला ‘या’ गोष्टीची वाटते भीती, आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी केला मोठा खुलासा

तो पुढे म्हणाला, “पर्थमध्ये इतर मैदानांपेक्षा जास्त उसळी आहे. आशा आहे की, आमचे गोलंदाज त्याचा फायदा घेऊ शकतील. जर टॉप ऑर्डरने आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली, तर रनरेट वाढवण्याची जबाबदारी मधल्या फळीवर येते. मी संघाच्या आवश्यकतेनुसार खेळतो.

विराटने आशिया कपमधून पुनरागमन केले आणि तेव्हापासून त्याने १२ डावांमध्ये ७८.२८ च्या सरासरीने ५४८ धावा केल्या आहेत. फॉर्ममध्ये परतल्यानंतर त्याने नाबाद १२२ धावांसह एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. मार्कराम पुढे म्हणाला की, माझा संघातील गोलंदाजांवर विश्वास आहे. एनरिक नॉर्टजे आणि कागिसो रबाडासारखे गोलंदाज फलंदाजांसाठी घातक ठरू शकतात.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup aiden markram fires warning to in form virat kohli ahead of group decider in ind vs sa vbm