T20 World Cup Aus vs NZ David Warner Wicket Video: टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ गटातील पहिल्याच सामन्यामध्ये सध्याचा विश्वविजेता संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडने ८९ धावांनी धुव्वा उडवला. ११ वर्षानंतर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. मागील ११ वर्षांचा विजयचा दुष्काळ न्यूझीलंडने या सामन्यात संपवला. २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातच अडखळत झाली. पॉवर प्लेच्या षटकांमध्येच ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. ३४ धावांवर ऑस्ट्रेलियाचे डेविड वॉर्नर, कर्णधार आरोन फिंच आणि मिचेल मार्श तंबूत परतले होते. त्यानंतर यजमान संघाला सामन्यात पुनरागमनच करता आले नाही. पूर्ण २० षटकंही यजमान संघाला खेळता आली नाहीत. १७.१ षटकांमध्ये १११ धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला.

या सामन्यामध्ये सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अगदीच विचित्र पद्धतीने क्लीन बोल्ड झाला. त्याचा बाद होण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांना तर अशाप्रकारे वॉर्नरसारखा खेळाडू बाद झाल्यावर विश्वासच बसत नाहीय. आरोन फिंच आणि वॉर्नर २०१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाचे सर्वात महत्त्वाचे खेळाडू होते. या दोघांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा ऑस्ट्रेलियन समर्थकांना होती. मात्र दुसऱ्याच षटकामध्ये वॉर्नर बाद झाला आणि सलामीची जोडी फुटली. वॉर्नर अवघ्या पाच धावा करुन तंबूत परतला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना फटकेबाजीच्या प्रयत्नात सलामीवीर फलंदाज लवकर बाद होणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र ज्या पद्धतीने वॉर्नर बाद झाला ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

अगदी समालोचकांनाही वॉर्नर अशा विचित्र पद्धतीने बोल्ड झाल्याचं पाहून धक्का बसल्याचं त्यांच्या बोलण्यावरुनच समजत होतं. वॉर्नरने पहिल्या षटकामध्येच दमदार फटकेबाजी करणार असल्याचे संकेत दिले होते. त्याने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला. त्यानंतर वॉर्नरने एक धाव कढल्याने तो पुढच्या ओव्हरला फलंदाजीसाठी आला.

दुसऱ्या षटकामध्ये टिम साउदी गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नरने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्यांच्या बॅटची कड घेऊन पॅडला लागला. मात्र वॉर्नरच्या दुर्देवाने हा चेंडू उडून पुन्हा बॅटला लागला. मात्र यावेळेस चेंडू बॅटच्या मागील बाजूला लागला अन् थेट स्टम्पवर आदळला. काही क्षणांमध्ये स्टम्पवरील बेल्समधील लाईट लागल्या अन् त्या जमीनीवर पडल्या. म्हणजेच समालोचक म्हणाला त्याप्रमाणे बॅट पॅड, बॅट अन् स्टम्प्स अशा विचित्र पद्धतीने वॉर्नर बाद झाला. वॉर्नर स्वस्तात तंबूत परल्याने न्यूझीलंडच्या संघाने एकच जल्लोष केला. वॉर्नरच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाला सावरताच आलं नाही.

विचित्र पद्धतीने बाद झाल्यानंतर वॉर्नरच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. आपण अशाप्रकारे बाद झालोय यावर वॉर्नरचाही विश्वास बसत नव्हता. अवघे सहा चेंडू खेळून वॉर्नर तंबूत परतला.

Story img Loader