ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स असा झाला. या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष होते. मात्र, नेदरलँड्सने अविश्वसनीय खेळ दाखवत विजेतेपदाचे दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेला १३ धावांनी पराभूत करत अपसेट घडवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो. पण शेवटी नॉक आऊट सामन्यांमध्ये हरतो, म्हणून त्यांना ‘चोकर्स’ म्हणतात.
या पराभवानंतर आफ्रिकेचे खेळाडू खूपच उदास दिसत होते. अनेक खेळाडूंच्या डोळ्यांतून अश्रूही तरळले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आणि डेव्हिड मिलर यांच्या डोळ्यात अश्रू स्पष्टपणे दिसत होते. वास्तविक, बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ नेदरलँडकडून पराभूत होईल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल.
हा पराभव पचवायला अवघड- बावुमा
या पराभवानंतर टेम्बा बावुमा म्हणाला की, “हे पचवायला खूपच अवघड आहे. एक एकसंध आणि मजबूत संघ म्हणून आम्हाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा विश्वास होता. पण दुर्दैवाने आम्ही जिंकू शकलो नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे हा निर्णय योग्य नव्हता. महत्त्वाच्या वेळी आम्ही विकेट गमावल्या. आम्ही करू शकलो नाही, त्या मैदानाचा नेदरलँडच्या खेळाडूंनी चांगला वापर केला.”
माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना मार्क बाउचर यांचा राजीनामा
उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या शेवटच्या सुपर-१२ सामन्यात नेदरलॅंड्सच्या संघाचा पराभव करायचा होता, परंतु त्यांना मोठा सामना गमवावा लागला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बाउचर यांनी म्हटले, “हा माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना आहे. मला वाटते की हे खूपच निराशाजनक आहे कारण एक खेळाडू म्हणून तुम्ही किमान अजूनही सामन्यात टिकून राहू शकले असता. प्रशिक्षक म्हणून तुम्ही ते इतर खेळाडूंवर सोडता आणि कोणत्या खेळाडूला कुठे वापरायचे यावर भर देता. पण होय, हा नक्कीच सर्वात वाईट पराभव होता.”
दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनी अलीकडेच टी२० विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका सोडणार असल्याचे जाहीर केले होते. पुढे ते म्हणाले, “मला वाटते की आमच्या योजना स्पष्ट होत्या, पण आम्ही त्यांचा योग्यपणे उपयोग केला नाही. मला वाटते की तुम्ही संपूर्ण सामना पाहिला असेल तर नेदरलँड्सने आम्हाला मागे टाकले. त्यांनी चांगल्या योजनांसह गोलंदाजी केली. मैदानावर ते आमच्यापेक्षा जास्त दबाव बनवू शकले, आम्ही त्यांच्यावर जेवढा दबाव टाकला त्याहून जास्त त्यांनी आमच्यावर दबाव टाकला.” असे प्रशिक्षक बाउचर यांनी म्हटले.