अॅडलेड : कर्णधार केन विल्यम्सनने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर न्यूझीलंडने शुक्रवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात आयर्लंडवर ३५ धावांनी मात केली. त्यानंतर न्यूझीलंडच्या निव्वळ धावगतीला मागे टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला १८५ धावांहून अधिकच्या फरकाने पराभूत करणे गरजेचे होते. मात्र, ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना १६८ धावांचीच मजल मारता आल्याने गतउपविजेत्या न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले.
आयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार विल्यम्सनला गेल्या काही काळात धावांसाठी झगडावे लागत होते. मात्र, मोक्याच्या क्षणी त्याला सूर गवसला. त्याने ३५ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ६१ धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात चांगल्या सुरुवातीनंतर आयर्लंडचा डाव २० षटकांत ९ बाद १५० धावांवर मर्यादित राहिला. मधल्या षटकांत मिचेल सँटनर (२/२६) आणि इश सोधी (२/३१) या फिरकीपटूंनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. युवा फिन अॅलनने (१८ चेंडूंत ३२ धावा) आक्रमक शैलीत खेळताना आयर्लंडच्या गोलंदाजांवर दडपण आणले. तो बाद झाल्यावर संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विल्यम्सनने आक्रमकता दाखवली. दुसऱ्या बाजूने डावखुऱ्या डेव्हॉन कॉन्वेला
(३३ चेंडूंत २८) मात्र धावांची गती राखता आली नाही. विल्यम्सनने कर्णधाराला साजेशी खेळी साकारताना या वर्षांतील केवळ दुसरे अर्धशतक साकारले. त्याला डॅरेल मिचेलची (२१ चेंडूंत नाबाद ३१) साथ लाभल्याने न्यूझीलंडला १८० धावांचा टप्पा ओलांडता आला.
आव्हानाचा पाठलाग करताना पॉल स्टर्लिग (२७ चेंडूंत ३७) आणि अँडी बालबिर्नी (२५ चेंडूंत ३०) यांनी आयर्लंडच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी ८ षटकांतच ६८ धावांची भागीदारी रचत आयर्लंडला धक्कादायक निकालाची संधी निर्माण करून दिली. मात्र, डावाच्या नवव्या षटकात डावखुरा फिरकीपटू सँटनरने बालबिर्नीला, तर दहाव्या षटकात लेग-स्पिनर सोधीने स्टर्लिगला माघारी धाडले. मग सँटनरने हॅरी टेक्टर (२) आणि सोधीने लोरकान टकर (१३) यांना बाद केले. आघाडीचे चार फलंदाज झटपट गमावल्यानंतर आयर्लंडचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांचा पराभव झाला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ६ बाद १८५ (केन विल्यम्सन ६१, फिन अॅलन ३२; जोश लिटिल ३/२२) विजयी वि. आयर्लंड : २० षटकांत ९ बाद १५० (पॉल स्टर्लिग ३७, अँडी बालबिर्नी ३०; लॉकी फग्र्युसन ३/२२, मिचेल सँटनर २/२६, टीम साऊदी २/२९)
लिटिलची हॅट्ट्रिक
आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटिलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिकची नोंद केली. त्याने न्यूझीलंडच्या डावातील १९व्या षटकात विल्यम्सन, निशम आणि सँटनर यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक मिळवणारा लिटिल हा सहावा गोलंदाज ठरला.