टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सलग दोन सामने जिंकणारा एकमेव संघ दक्षिण आफ्रिका रविवारी ३० ऑक्टोबर रोजी भारतासमोर पुढील आव्हान असणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ असतील. पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे, तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. टीम इंडियाच्या फलंदाजीचा विचार करता केवळ उपकर्णधार केएल राहुलने आतापर्यंत धावा केल्या नाहीत. पाकिस्तानपाठोपाठ नेदरलँड्सविरुद्धही राहुल धावा काढण्यात अपयश आले.
राहुलच्या खराब कामगिरीनंतर क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा सुरू होती की, संघ व्यवस्थापन राहुलऐवजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला संधी देऊ शकते का? ऋषभ पंत हा टी२० विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा भाग आहे, परंतु त्याला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ऋषभ पंतबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “संघ असा काही विचार करत नाही.”
भारतीय फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “नाही, नाही आम्ही असा विचार करत नाही. फक्त दोनच सामने झाले आहेत. राहुल शानदार फलंदाजी करत असून सराव सामन्यातही त्याने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आम्ही सध्या अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही.”
सहा ऑक्टोबरला टीम इंडिया टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली. त्यानंतर भारताने प्रथम पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले. हे दोन्ही सामने पर्थमध्ये खेळले होते, त्यामुळे भारताला या ठिकाणच्या परिस्थितीची जाणीव आहे. अशा स्थितीत भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फारशी अडचण येणार नाही. याबाबत विक्रम राठोड म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार हे संघाला माहीत होते, त्यामुळे संघाने सरावासाठी पर्थला येण्याचा निर्णय घेतला.”
राठोड पुढे म्हणाले, ‘पर्थमध्ये आठवडाभर राहण्याचा फायदा आम्हाला मिळेल, त्यामुळेच आधी सरावासाठी पर्थमध्ये येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आमच्यासाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळेच आम्ही पहिले पर्थला आलो आणि इथे आल्यानंतर सराव केला. ही परिस्थिती आम्हाला मदत करेल. आमच्याकडे ज्या प्रकारचा संघ आहे, ते पाहता आम्हाला वेगवान गोलंदाजीची काही अडचण असेल असे वाटत नाही.”