आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या ३३व्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने होते. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड संघ केवळ १५९ धावा करू शकला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, इंग्लंडने अखेरच्या पाच षटकात शानदार गोलंदाजी करत सामना २० धावांनी खिशात घातला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाकडून ग्लेन फिलिप्सने ३६ चेंडूत ६२ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या गोलंदाज सॅम करनने त्याला लॉंग ऑनवर झेलबाद केले. याआधी ख्रिस वोक्सने डॅरिल मिशेलला तंबूत पाठवले. त्याचा झेलही जॉर्डनने लाँग ऑनवर घेतला तो काही काळासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता. मिशेलला केवळ ३ धावा करता आल्या.
शेवटच्या ५ षटकात ५७ धावांची गरज असताना आधी वूडने तीन धावा व मिचेलचा बळी तर वोक्सने ५ धावा देत निशामला बाद करत इंग्लंडला सामन्यात पुढे केले. आणखी वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात फिलिप्स बाद झाला व न्यूझीलंडच्या आशांना सुरुंग लागला. त्याने ३६ चेंडूवर ६२ धावांची वादळी खेळी केली. शेवटी न्यूझीलंडचा डाव ६ बाद १५९ धावांवर मर्यादित राहिला. बटलरला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ग्रुप ए मधील समीकरण
या विजयासह इंग्लंडचा संघ गट एकमधून उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. आता न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी पाच गुण आहेत. तिन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून अजून एक सामना खेळायचा आहे. तीन संघांचा प्रत्येकी एक सामना पावसामुळे वाहून गेला. न्यूझीलंड चार सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह पाच गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचा निव्वळ रन रेट +२.३३३ आहे जो सर्वोच्च आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ चार सामन्यांत दोन विजय आणि एक पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा निव्वळ रन रेट +०.५४७ आहे. ऑस्ट्रेलियाचा निव्वळ रन रेट -०.३०४ आहे आणि ते तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघही अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे.
तत्पूर्वी, जोस बटलरने ४७ चेंडूत ७३ धावा करत मोलाचा वाटा उचलला. बटलरने ७३ धावांच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. इंग्लंडला हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर त्यांचे विश्वचषकातील आव्हान आजच संपुष्टात आले असते. लियाम लिव्हिंगस्टोनने १४ चेंडूत २० धावा केल्या आणि तो फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्युसन सर्वात यशस्वी ठरला. त्याने ४५ धावांत २ बळी घेतले. त्याच वेळी, ईश सोधी सर्वात किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले. त्याने ४ षटकात २३ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली.