आयसीसी टी२० विश्वचषकात आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात ग्रुप ए मधील सामना सुरु आहे. सिडनीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने सात गडी गमावून १६७ धावा केल्या. किवी संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने १०४ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

ग्लेन फिलिप्सने आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. फिलिप्सशिवाय डॅरिल मिशेल हा किवी संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिचेलने २४ चेंडूत २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ग्लेन फिलिप्सने ६४ चेंडूत १०४ धावांची तुफानी खेळी केली. त्याला वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर एक जीवदानही मिळाले आणि तोच सोडलेला झेल आज श्रीलंकेला अडचणीत आणताना दिसत आहे.

तत्पूर्वी,  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव पावर प्लेमध्ये गडगडला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित गोलंदाजी करत न्यूझीलंडचे तीन फलंदाज तंबूत पाठवले. अ गटात अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ताबडतोब सुरुवात देणारे डेवॉन कॉनवे व फिन ऍलन यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली. श्रीलंकेकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या महिश तिक्षणा याने आपल्या संघाला पहिले यश मिळवून देण्यासाठी फारसा वेळ लावला नाही. त्याने पहिल्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर ऍलनचा केवळ एका धावेवर त्रिफळा उडवला.

 त्यानंतर संघासाठी तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अष्टपैलू धनंजय डी सिल्वाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद ९२ धावांची खेळी केलेल्या डेवॉन कॉनवेला त्रिफळाचीत केले. त्याने देखील केवळ एक धाव बनवली. त्यामुळे संघाचे दोन्ही सलामीवीर धावफलकावर केवळ ७ धावा असताना माघारी परतले. मागील काही काळापासून सातत्याने खराब कामगिरी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या सामन्यात देखील अपयशी ठरला. १३ चेंडूवर ७ धावा करत त्याने कसून रजिथाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल सोपवला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पावर प्लेमध्ये ६० पेक्षा जास्त धावा फटकावणारा न्यूझीलंडचा संघ या सामन्यात पावर प्लेमध्ये पुरता अपयशी ठरला. तिक्षणा, रजिथा व डी सिल्वा या तिघांनी न्यूझीलंडला पावर प्लेमध्ये केवळ २५ धावा काढू दिल्या.

Story img Loader