भारतीय संघ टी२० विश्वचषकात गुरुवारी (१० नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे, पण त्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये दिनेश कार्तिक की ऋषभ पंत या दोघांपैकी नक्की कोणाचा समावेश करायचा हे संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान असणार आहे. कार्तिक या स्पर्धेत यष्टीरक्षणासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची पहिली पसंती ठरला आहे. त्याचवेळी पंतला झिम्बाब्वेविरुद्धची संधी मिळाली. आता या महत्त्वाच्या सामन्यात दोघांपैकी कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत आपला पर्याय दिला आहे.
रवी शास्त्री म्हणतात की, “जर भारताला इंग्लंडविरुद्ध जिंकायचे असेल तर त्यांना त्यांचा एक्स-फॅक्टर खेळाडू संघात ठेवावा लागेल, तो म्हणजे ऋषभ पंत.” शास्त्री पुढे म्हणाले की, “कार्तिक हा महान खेळाडू आहे, पण इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध आक्रमक खेळाडूची गरज भासेल आणि हे काम डावखुरा फलंदाज हे करू शकतो.
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “पंतने इंग्लंडमध्ये आणि त्यांच्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याने स्वबळावर सामने जिंकले आहेत. तो संघात एक्स-फॅक्टर म्हणून काम करतो. पंत जर इंग्लंड विरुद्ध मोठी खेळी खेळून गेला तर टीम इंडियासाठी काम सोपे होऊन जाईल आणि माझ्या मते हे काम उपांत्य फेरीत होऊ शकते. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अशा प्रकारचे खेळाडू संघात असणे महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा : T20 World Cup 2022: ‘एक-दोन गडी…’ रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर कपिल देव नाराज
दिनेश कार्तिकला संघातून वगळू नये : वीरेंद्र सेहवाग
रवी शास्त्रीशिवाय भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही कार्तिक आणि पंत यांच्याबाबत आपले मत मांडले आहे. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला की, ”इंग्लंडविरुद्ध कार्तिकला वगळू नये. तो तुमची पहिली पसंती असल्यास, संपूर्ण स्पर्धेत त्याच्यासोबत खेळा. बाहेर पडल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जर त्यांनी धावा केल्या नाहीत तर त्याला आत्मविश्वास द्या. त्यांना या गोष्टीची गरज आहे.”