पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर चांगलाच संतापलेला दिसत आहे. ‘सुपर १२’मधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यामध्येही शेवटच्या चेंडूवर पराभवाचं तोंड पहावं लागल्याने शोएब अख्तरने संतापून भारत टी-२० विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडेल असं भाकित केलं आहे. जरा संतापलेल्या स्वरामध्येच पुढील आठवड्यात भारत उपांत्यफेरीमध्ये पराभूत होऊन मायदेशी परत येईल असं शोएबने म्हटलं आहे. भारत काही ‘तीस मार खान’ नाही असं शोएब म्हणाला आहे.
नक्की वाचा >> पाकिस्तान T20 World Cup मधून जवळजवळ बाहेर! मात्र भारताच्या हाती आहे पाकच्या सेमी फायनलचं तिकीट; समजून घ्या Points Table
झिम्बाब्वेने पाकिस्तानवर निसटता विजय मिळवल्यानंतर शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये तो फारच संतापलेला दिसत होता. या व्हिडीओत बराच वेळ तो असंबंध बडबड करतोय की काय असं वाटण्याइतका त्याचा संताप वक्तव्यांमधून दिसून येत होता. त्याने यावेळी पाकिस्तान याच आठवड्यामध्ये परत मायदेशी येईल असं मी म्हटलं होतं, असा संदर्भही दिला. ज्या संघाला चांगलं नेतृत्व नाही त्या संघाकडे जिंकण्याची क्षमता नाही असं म्हणत शोएबने कर्णधार बाबर आझमला लक्ष्य केलं.
नक्की वाचा >> Zimbabwe Beat Pakistan: “पुढच्या वेळेस…”; झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनीही पाकिस्तानची लाज काढली; ‘ती’ पोस्ट चर्चेत
रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएबने पाकिस्तानी संघाशी संबंधित सर्वांनाच या व्हिडीओमध्ये लक्ष्य केल्याचं दिसून आलं. कर्णधार बाबर आझम, पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापन, सलामीवीर, मधल्या फळीतील फंलदाज आणि गोलंदाजांनाही शोएबने सुनावलं. “मी तुमची पाठराखण करावी. मी नक्कीच करेन. पण तुम्ही त्यापद्धतीचा खेळ करत आहात का? तुम्हाला कोणीही सामना भेटवस्तू सारखा हा घ्या विजय असं म्हणत जिंकून देणार नाही. तुम्ही झिम्बाब्वेविरुद्ध हारला आहात,” असा टोला शोएबने लावला.
नक्की वाचा >> Zimbabwe Beat Pakistan: झिम्बाब्वेच्या संघातून खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने मिळवून दिला विजय; ठरला सामनावीर
शोएबने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावरही निशाणा साधला. राजा हे काही कामाचे नाहीत असं शोएब म्हणाला. “पाकिस्तानचा कर्णधार वाईट आहे यात काही शंका नाही. पाकिस्तान संघ त्यांच्या दुसऱ्या सामन्यातच विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला आहे आणि तो सुद्धा झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत होऊ,” असं म्हणत शोएबने संताप व्यक्त केला. “स्वत:ला अडचणीत आणण्याइतकं तुम्ही वाईट का खेळता?” असा प्रश्न शोएबने पाकिस्तानी संघाला विचारला.
पाकिस्तानी संघावर जोरदार टीका केल्यानंतर शोएबने, “मैने पहले भी कहा था कि पाकिस्तान इस हफ्ते वापस आ जाएगी और अगले हफ्ते इंडिया वापस आ जाएगी। वो भी कोई तीस मार खान नहीं हैं,” म्हणत भारतीय संघाबद्दलही विधान केलं. शोएबनं कारण नसताना भारताचा उल्लेख या ठिकाणी केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. यावरुन शोएबचा पाकिस्तानच्या पराभवानंतरचा जळफळाट दिसून येत असल्याचीही टीका भारतीय चाहत्यांकडून केली जात आहे.