टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. इतर देशातील माजी खेळाडूंनी भारताच्या या प्रदर्शनाबाबत टीका केलीच, पण त्याचबरोबर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यापासून वीरेंद्र सेहवाग यानेही भारतीय संघाला खडे बोल सुनावले. मात्र क्रिकेटचा देव म्हणवला जाणारा सचिन तेंडुलकर आता भारतीय संघाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला आहे.
सचिनने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा बचाव केला आहे. सचिन म्हणाला की भारतीय संघाच्या या प्रदर्शनाच्या आधारावर त्यांचे आकलन केले जाऊ नये. भारतीय संघ टी२० मध्ये नंबर एक स्थानावर आहे आणि हे एका रात्रीत घडत नाही.
एएनआयच्या एका व्हिडीओमध्ये सचिन म्हणाला, “आपल्यासाठी हा एक कठीण सामना होता. एकही विकेट न घेता १७० धावा! हा निराशाजनक नाही तर अतिशय वाईट पराभव होता. मात्र, केवळ या प्रदर्शनावरून आपण आपल्या संघाचे मोजमाप करू नये. कारण आपला संघ जगातील नंबर एक टी२० संघ आहे. या स्थानावर ते एका रात्रीत पोहोचलेले नाही. तुम्हाला वेळेनुसार चांगले क्रिकेट खेळावे लागेल आणि संघाने तेच केले आहे.”
सचिन पुढे म्हणाला, “हे प्रदर्शन नक्कीच वाईट होते. खेळाडूंना सुद्धा मैदानात जाऊन अयशस्वी व्हायचे नसते, मात्र प्रत्येक दिवस आपला नसतो. खेळात चढ-उतार येतच राहतात. विजय सगळ्यांचा मात्र पराभव केवळ संघाचा, असे होऊ शकत नाही. आपल्याला या काळात आपल्या संघाबरोबर उभे राहिले पाहिजे.”
सचिनने सांगितले की अॅडलेडच्या खेळपट्टीवर भारताची धावसंख्या बचावासाठी पुरेशी नव्हती आणि गोलंदाजांनी विकेट न घेतल्याने परिस्थिती आणखीच बिघडली. तो म्हणाला की १६८ हा खूप चांगला आकडा नव्हता कारण मैदानाच्या बाजूच्या सीमा खूपच लहान आहेत. कदाचित १९० किंवा त्याहून अधिक धावा करणे संघासाठी फायदेशीर ठरले असते. अॅडलेडमधील १६८ ही धावसंख्या इतर मैदानातील १५० च्या बरोबरीची आहे आणि हा स्कोर लढण्यासारखा नाही. आपण हे स्वीकारायला हवे की आपण चांगला स्कोर केला नाही आणि गोलंदाजीच्या बाबतीत आपण विकेट्स घेण्यातही अपयशी ठरलो.