न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने म्हटले आहे की, “सूर्यकुमार यादवच्या ‘खुल्या आणि आक्रमक’ दृष्टिकोनामुळे त्याच्या फलंदाजीत कमकुवतपणा शोधणे कठीण आहे. सध्या, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक, फ्लेमिंग सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीने पूर्णपणे प्रभावित झाले असून त्यांनी त्याचे खूप कौतुक केले. रविवारी म्हणजेच ३० ऑक्टोबरला सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४० चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी खेळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्थ येथे झालेल्या या सामन्यात भारताने एकेवेळी ४९ धावांवर पाच गडी गमावले होते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत एकट्याच्या दमावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढला. तसेच, संघाची धावसंख्या ९ बाद १३३ करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या फलंदाजीनंतर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले.

फ्लेमिंगने कबूल केले की सूर्यकुमारकडे एक तंत्र आहे जे त्याला अधिक कार्यक्षमतेने शॉर्ट-पिच गोलंदाजीचा सामना करण्यास मदत करते. फ्लेमिंगने ईएसपीएन क्रिकइन्फोच्या टी२० टाइम आउट शोमध्ये सांगितले की, “त्याच्या फलंदाजीत कमकुवतपणाचे क्षेत्र शोधणे कठीण आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “सूर्यकुमार यादव  याचा टी२० मधील फलंदाजी अशा स्तरावर आहे, ज्यात त्याच्या खेळातील चुका काढणे खूपच कठीण आहे. सूर्यकुमारच्या फटकेबाजी तंत्राबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले की, “सूर्याने मैदानात वेगवेगळ्या लेंथवर आपल्या खेळाचे नियंत्रण दाखवले, ज्यामुळे तो यशस्वी झाला. तो ३६० डिग्री फटके मारणारा फलंदाज आहे.

स्टीफन फ्लेमिंग पुढे काय म्हणाले

ते म्हणाले, “सूर्या त्याच्या सकारात्मक मानसिकेतेने फलंदाजी करतो. त्याच्याकडे खूप खुली मानसिकता आणि आक्रमक भूमिका आहे, ज्यामुळे तो बर्‍याच असामान्य भागात फटके खेळू शकतो. त्याने फलंदाजीचे स्वतःचे एक तंत्र तयार केले आहे. त्याचा स्टान्स खूपच खुललेला आणि आक्रमक आहे, त्यामुळे त्याला कुठेही फटका मारण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याने आपले खेळण्याचे तंत्र अशाप्रकारे विकसित केले आहे की, गोलंदाजांना योग्य क्षेत्रात चेंडू टाकण्यासही अडचण येते. कारण, त्यांनी फुल लेंथचा चेंडू फेकला, तर कव्हर्सच्या वरून शॉट जाईल आणि जर चेंडू शॉर्ट टाकला, तर थर्ड मॅन किंवा पॉईंटच्या वरून चेंडू जाईल,” असे फ्लेमिंग म्हणाले.

याच शोमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला की, “सूर्यकुमार यादवची गुणवत्ता ही आहे की त्याला कधी धोका पत्करायचा हे माहीत आहे. माजी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पुढे म्हणाला, “सुर्यकुमार यादवची शैली इतकी उच्च आहे की एक गोलंदाज म्हणून तुम्ही त्याच्यावर कोणत्या क्षेत्रात वर्चस्व गाजवू शकता हे तुम्हाला कळत नाही. त्याच्याकडे सर्वप्रकारचे शॉट्स आहेत.तो मैदानाच्या सर्व भागात धावा काढतो. त्याची फलंदाजी पाहून मला एबी डिव्हिलियर्सची आठवण होते तो सुद्धा ३६० डिग्री शॉट्स मारतो.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup it is very difficult to fault suryakumars batting a big statement from the former new zealand captain avw