आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात ग्रुप बी मधील सामना सुरु आहे. ब्रिस्बेन मधील गाबा येथील मैदानावर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघाने सात गडी गमावून १५० धावा केल्या. बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाज नजमुल हुसेन शांतोने शानदार ७१ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

नजमुल हुसेन शांतोने आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. नजमुल हुसेन शांतो शिवाय अफिफ हुसैन हा बांगलादेश संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हुसैनने १९ चेंडूत २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. नजमुल हुसेन शांतोने ५५ चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी केली. त्याला झिम्बाब्वेचा सिकंदर रझाने ऑफ स्पिन गोलंदाजीवर बाद केले.

तत्पूर्वी,  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव पॉवर-प्ले मध्ये गडगडला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित गोलंदाजी करत बांगलादेशचे दोन फलंदाज तंबूत पाठवले. ब गटात चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघाला ताबडतोब सुरुवात देणारे सौम्य सरकार व नजमुल हुसेन शांतो यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली. झिम्बाब्वेकडून षटक टाकण्यासाठी आलेल्या मुजरबानी ब्लेसिंग याने आपल्या संघाला पहिले यश मिळवून देण्यासाठी फारसा वेळ लावला नाही. त्याने पॉवर प्ले मध्ये बांगलादेश संघाला सौम्य सरकार आणि लिटन दास यांच्या रूपाने दोन धक्के दिले होते. नागरवा रिचर्ड याला ही दोन गडी बाद करण्यात यश आले.

झिम्बाब्वेने गेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून मोठा फरक केला. अशा परिस्थितीत या आफ्रिकन देशाला हलक्यात घेण्याची चूक ते करू शकत नाहीत हे शाकिब अल हसन अँड कंपनीला चांगलेच ठाऊक आहे. झिम्बाब्वे सध्या गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर आहे दोन सामन्यांतून एक विजय आणि एक अतुलनीय सामना. त्याचवेळी बांगलादेशने दोनपैकी एक सामना जिंकला आणि एक पराभव पत्करला. गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत.

Story img Loader