आज १३ नोव्हेंबरला टी२० विश्वचषकातील अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या संघांमध्ये खेळला जाणार आहे. मेलबर्न मैदानात काही वेळातच या सामन्याला सुरुवात होईल. भारत जरी या स्पर्धेतून बाहेर पडला असला, तरीही आजच्या सामन्याला घेऊन चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड हा खिताब जिंकण्याच्या तयारीत आहेत, मात्र ट्रॉफीबरोबरच त्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे.
यंदाचे टी२० विश्वचषक जिकणाऱ्या संघाला तब्बल १.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार १३.०३ कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. तर उपविजेता संघाला ०.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६.५ कोटी रक्कम बक्षीस रूपात मिळेल. मात्र आयपीएल आणि जगातील इतर मुख्य टी२० लीगच्या विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेच्या तुलनेत टी२० विश्वचषकाची बक्षीस रक्कम कितव्या स्थानावर येते तुम्हाला माहित आहे का? आज आपण याबाबत सविस्तर आढावा घेणार आहोत.
आयपीएल २०२२ चा विजेता संघ ‘गुजरात टायटन्स’ला २० कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली. विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसाच्या तुलनेत ही रक्कम जवळपास सात कोटी अधिक आहे. तर पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२२ चा विजेता संघ लाहोर कलंदरला बक्षीस रक्कम म्हणून ३.४० कोटी रुपये मिळाले होते. त्याचप्रमाणे कॅरिबियन प्रीमियर लीगचे विजेता जमैका तल्लावाहांना ८.१४ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली, तर बांगलादेश प्रीमियर लीग चॅम्प्सना ६.९२ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.
ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग (BBL) चॅम्प्सना ३.६६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली, तर इंग्लंड द हंड्रेडला १.३ कोटी रुपयांचे बक्षीस पूल आहे. दरम्यान, आयसीसीच्या घोषणेनुसार, टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील चारही संघांना ४ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ३ कोटी २५ लाख रुपये मिळणार आहे. तसेच, सुपर १२ स्टेजमधील चार विजेत्यांना ४० हजार डॉलर्स मिळणार आहेत. त्यामुळे भारताला अतिरिक्त १.२८ कोटी रुपये मिळू शकतात. यानंतर स्पर्धेतील भारताची एकूण बक्षीस रक्कम ५ लाख ६० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास किंवा ४.५० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.