T20 World Cup Winning Prize : टी २० विश्वचषकाचा महाअंतिम सामना हा १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानात रंगणार आहे. अनेक आश्चर्यकारक ट्विस्टने रंगलेला यंदाचा विश्वचषक हा क्रिकेटप्रेमींमध्ये हिट ठरला. प्रत्येक सामन्यात उत्साह वाढवणारा हाय व्होल्टेज ड्रामासहित पाहायला मिळाला. सुपर १२ च्या गटातून, सेमीफायनलचा टप्पा पार करून पाकिस्तान व इंग्लंड हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडला तर इंग्लंडने भारताला पराभूत करून आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. अंतिम सामन्यात इंग्लंडला धूळ चारल्यास पाकिस्तानी क्रिकेट संघाला मालामाल होण्याची संधी आहे. आयसीसीच्या घोषणेनुसार पाकिस्तानला मिळू शकणाऱ्या बक्षिसाची रक्कम ऐकून आपणही थक्क व्हाल, चला तर सविस्तर जाणून घेऊयात..
टी २० विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने यंदाच्या बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती, प्राप्त माहितीनुसार, यंदा टी २० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला १.६ मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास १३ कोटी ४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीमध्ये हरणाऱ्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ६ कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.
आयसीसीच्या घोषणेनुसार, टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील चारही संघांना ४ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ३ कोटी २५ लाख रुपये मिळणार आहे. यानुसार आता भारत व न्यूझीलंडला ३ कोटीच्या बक्षिसावर समाधान मानावे लागणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या इंग्लंडच्या विजयात सर्वात मोठा वाटा होता तो सलामीवीरांचा,ज्यांनी विकेट न गमावता संघाला या लक्ष्यापर्यंत पोहोचवले. जोस बटलरने ८० आणि अॅलेक्स हेल्सने ८६ धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद १७० धावांची भागीदारी केली. तर दुसरीकडे पाकिस्तान, हा संपूर्ण विश्वचषकात दुबळा ठरलेला संघ ऐन मोक्याच्या वेळी आपल्या सर्व खेळाडूंचा फॉर्म परतल्याने न्यूझीलंड विरुद्ध एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत पोहोचला आहे.