आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. भारत- पाकिस्तान सामन्यातील डेड बॉल, नो बॉल प्रकरण आणि आता दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे यांच्या काल झालेल्या सामन्यातील पाच धावांचा आफ्रिकेला बसलेला दंड. क्रिकेट हा खेळ बघायला आणि खेळायला जरी सहज -सोप्पा वाटत असला तरी यातील अनेक नियम हे अतिशय गुंतागुंतीचे आहेत. असाच काहीसा प्रकार कालच्या टी२० सामन्यात पाहायला मिळाला.
ब गटातील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्या सामन्यात काल पावसाने गोंधळ घातल्याने सामना ९-९ षटकांचा करण्यात आला. झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पावसामुळे सामना लांबला. नंतर ती नऊ षटके कमी करण्यात आली. झिम्बाब्वेने नऊ षटकांत पाच गडी गमावून ७९ धावा केल्या. त्या ७९ धावांमध्ये क्विंटन डी कॉक एका चुकीने झिम्बाब्वेला ५ धावा या फुकट मिळाल्या. ८० धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने तीन षटकांत ५१ धावा केल्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना पुन्हा थांबला.
पाच धावांचा दंड ही दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकची नकळत झालेली चूक कारण ठरली. शेवटच्या षटकात मिल्टन शुम्बाने एनरिक नॉर्खियाच्या तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप फटका खेळला आणि चेंडू बॅटला लागून फाइन लेगला गेला. तिथे फिल्डरने चेंडू अडवून क्विंटन डी कॉककडे फेकला. तो चेंडू डी कॉकच्या पायाने अडला, पण तिथेच त्याच्या संघाचे नुकसान झाले. चेंडू थांबवण्यापूर्वी, डी कॉकने एक ग्लोव्ह्ज काढला होता. चेंडू पायावर आदळला आणि त्या मैदानावर पडलेल्या ग्लोव्ह्जवर जाऊन लागला.
काय सांगतो आयसीसीचा नियम
आयसीसीच्या नियमानुसार, पंचानी पेनल्टी धावांचे संकेत देताच नॉर्खियाला धक्का बसला. नंतर त्याला कारण समजावून सांगण्यात आले. हा नियम असा की- खेळाडूच्या अंगावरील एखादी गोष्ट म्हणजे हेल्मेट, ग्लोव्ह्ज, रूमाल अशा कोणत्याही गोष्टी जमिनीवर पडलेल्या असतील आणि त्याला चेंडू लागला, तर नियमानुसार प्रतिस्पर्धी संघाला ५ गुण मोफत दिले जातात.