टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२९ धावा करता आल्या आणि त्यांनी एका धावेने सामना गमावला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि निवड समितीवर सडकून टीका केली.

शोएब अख्तर म्हणाला की, “अजून सरासरी असणारे खेळाडूंची निवड करा म्हणजे जगात पाकिस्तानची जास्त इज्जत काढतील. बाबर आझमचे नेतृत्व हे दिशाहीन असून कधी कोणत्या खेळाडूला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे आणि कोणाला गोलंदाजीला द्यायचे या संदर्भात अजिबात माहिती नाही. कधी-कधी तर मला असं वाटत की हा खरच कर्णधार म्हणून पाकिस्तान संघाला पुढे घेऊन जावू शकतो का?” असे म्हणत त्याने कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुढे बोलताना अख्तरने असे म्हटले की, “ सलामीला फलंदाजी करण्याचा बाबरचा हट्ट हा निव्वळ मूर्खपणा आहे. फखर जमान सारखा मोठे फटके मारणारा खेळाडू बाकावर बसून ठेवणे यातच बाबरची कर्णधारपदाबाबतची समज दिसून येते. असिफ अली सारखा फलंदाज तुम्ही आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवता मग तुमची हार नक्की आहे.”

निवड समितीवर टीका करताना शोएब अख्तर म्हणाला की, “असे सरासरी खेळाडू निवडल्यावर आणखी दुसरं काय होणार संपूर्ण जगात नाचक्की झाली पाकिस्तान संघाची, शेवटी भारतीय टेलीव्हिजन आणि इतर मीडियावर आम्हाला तोंड द्यावे लागते. अजून अशा सरासरी खेळाडूंची निवड करा म्हणजे लवकर घरी येवू.” असे त्याने त्याच्या युट्युब व्हिडिओ मधून संताप व्यक्त केला.

Story img Loader