आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ चा ३२ वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमवर खेळला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अफगाणिस्तानने २० षटकात आठ बाद १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने १८.३ षटकात हे आव्हान गाठत अफगाणिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयाने श्रीलंकेचे उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. अफगाणिस्तान मात्र उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत सुपर-१२ मध्ये दुसरा विजय नोंदवला. त्याचे आता चार सामन्यांत चार गुण झाले आहेत. ते अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचे चार सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. जरी त्यांनी एक सामना जिंकला तरी केवळ त्यांचे चार गुण होऊ शकतील. अफगाणिस्तानला आता न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे बाकी राहिले आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा अफगाणिस्तान हा दुसरा संघ आहे. त्याआधी नेदरलँड्स ग्रुप बी मधून बाहेर पडला आहे.
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे दोन फलंदाज लवकर बाद झाले पण त्यानंतर धनंजय डी सिल्वाने डाव सावरत सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. ४२ चेंडूंच्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. कुसल मेंडिसने २५, चरित असलंकाने १९, भानुका राजपक्षेने १८ आणि पाथुम निसांकाने १० धावांचे योगदान देत त्याला साथ दिली. कर्णधार दासुन शनाका फलंदाजीला आला मात्र तोपर्यंत सामना जिंक्ल्यातच जमा होता. त्यामुळे त्याला एकही धाव काढण्याची संधी मिळाली नाही. श्रीलंकेकडून तीन बळी घेणाऱ्या वानिंदू हसरंगाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने शेवटच्या ३ गडी अवघ्या ४ धावांत गमावले होते. यामध्ये वानिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले. हसरंगाने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये १३ धावांवर अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. अफगाणिस्तानने १५ षटकांत ३ बाद १०४ धावा केल्या. त्याने 8व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. रहमतुल्ला गुरबाज, उस्मान गनी आणि इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झदरन, गुलबदिन नायब, कर्णधार मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान हे फलंदाज बाद झाले. ७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गुरबाजला लाहिरू कुमाराने त्रिफळाचीत केले. गुरबाज २४ चेंडूंत २८ धावा करून तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारले. ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उस्मान घनी वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. त्याला कर्णधार दासुन शनाकाने झेलबाद केले. उस्मान गनी २७ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २७ धावा करून तंबूत परतला.
लाहिरू कुमाराने इब्राहिम झद्रानलाही आपला बळी बनवले. झाद्रानने १८ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. नजीबुल्ला झद्रानने १६ चेंडूत १८ धावा केल्या आणि धनंजय डी सिल्वाच्या चेंडूवर हसरंगाने झेलबाद केले. गुलबदिन नायब १४ चेंडूत १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद नबीने ८ चेंडूत १३ आणि राशिद खानने ८ चेंडूत ९ धावा केल्या. मुजीब उर रहमानला केवळ एक धाव करता आली.