टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा सामना पराभव झाला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२९ धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या फॉर्मवर चोहीकडून टीका होताना दिसत आहे.
विराटला सूर गवसला आणि बाबरने गमावला अशी परिस्थिती झाली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. सिडनीमध्ये झालेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली ४४ चेंडूत ६२ धावा करून नाबाद परतला. त्याचवेळी, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या. २०२२ च्या टी२० विश्वचषकात भारताच्या माजी कर्णधाराची बॅट खूप काही बोलत आहे. आकडेवारी दर्शवते की २०२१ पासून, विराट कोहलीने टी२० फॉरमॅटमध्ये ६१.८६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीचा स्ट्राइक रेट १३८.५ राहिला आहे.
वाईट काळातही बाबर-रिझवानपेक्षा किंग कोहली सरस होता!
वास्तविक, गेल्या जवळपास २ वर्षांत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी टी२० फॉरमॅटमध्ये खूप धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवानने २०२१ पासून टी२० फॉरमॅटमध्ये ६३.२१ च्या सरासरीने आणि १३०.७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याचवेळी, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने २०२१ पासून टी२० फॉरमॅटमध्ये ३६.९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान पाकिस्तानी कर्णधाराचा स्ट्राईक रेट १२९.१६ राहिला आहे. विराट कोहलीची तुलना पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याशी करताना आकडेवारीवरून दिसून येते की, माजी भारतीय कर्णधार दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा कितीतरी पटींनी सरस आहे.