टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा सामना पराभव झाला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२९ धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिकंदर रजाने चार षटकात २५ धावा देत तीन बळी घेतले या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पर्थ येथे झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी ५ षटकात ४२ धावांची सलामी दिली. मात्र, त्यांचे दोन्ही सलामीवीर एकापाठोपाठ तंबूत परतले. सुंबा फारसे योगदान देऊ शकला नाही. शादाब खान व मोहम्मद वसीम यांनी सहा चेंडूच्या अंतरात झिम्बाब्वेचे चार गडी तंबूत पाठवत पाकिस्तानला सामन्यात पुन्हा जागा बनवून दिली. मात्र, सीन विल्यम्सच्या ३१ व ब्रॅड एवान्सच्या १९ धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने १३० धावा धावफलकावर लावल्या.
झिम्बाब्वेचे विजयासाठीचे १३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला ब्रॅड एव्हान्सने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार बाबर आझमला १३ धावांवर बाद केले. पाठोपाठ मुझारबानीने मोहम्मद रिझवानचा १४ धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानचे दोन्ही स्टार तंबूत पाठवले. दोन्ही अव्वल फलंदाज माघारी गेल्यानंतर अनुभवी शान मसूदने इफ्तिकार अहमद सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र जाँग्वेने इफ्तिकारला ५ धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था ७.४ षटकात ३ बाद ३६ धावा अशी केली.
याआधी या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचे संघ अपसेटचे बळी ठरले आहेत. आता पाकिस्तानही पलटवाराचा बळी ठरला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला पुढची वाट ही खडतर झाली असून उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी त्यांना सगळे सामने हे मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.