भारतीय क्रिकेट संघाचे मिशन, टी२० विश्वचषक २०२२, आज खर्या अर्थाने सुरू झाले असून, टीम इंडियाचा पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झाला. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे एकापाठोपाठ एक असे चार गडी बाद केले. त्यात एक धावबाद होता. विराट कोहलीने टीम डेव्हिडचा अप्रतिम असा झेल पकडला आणि त्याआधी एक अॅश्टन अॅगरला धावबाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाला १८७ धावांचे लक्ष्य दिले होते. ब्रिसबेनच्या गाबा येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा याला खाते उघडण्यासाठी पाचवे षटक लागले. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर लोकेशने उत्तुंग फटके खेचले. त्यापैकी ३ प्रयत्न थेट स्टेडियममध्ये पोहोचले. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार खेचले. मोठ्या मैदानांवर षटकार मारणे सोपे नक्कीच नाही. त्या पाठोपाठ रोहित व विराट कोहली यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा देखील लौकीकास साजेसा खेळ करू शकला नाही. त्याने केवळ २ धावा केल्या. दिनेश कार्तिक याने २० धावांचे योगदान दिले.
धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श व अॅरोन फिंच यांनी भारतीय गोलंदाजांना चोपत पॉवर प्लेमध्ये ६४ धावा काढल्या. १८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा करणाऱ्या मार्शचा सहाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्रिफळा उडवला. स्टीव्हन स्मिथ ११ धावा करत युजवेंद्र चहलच्या फिरकीवर त्रिफळाचीत झाला. फिंच एकाबाजूने चांगली फटकेबाजी करत होता. त्याने अर्धशतक पूर्ण केले. मॅक्सवेलचा १९ धावांवर युजवेंद्र चहलने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सोडला. पण, भुवनेश्वर कुमारने १६व्या षटकात मॅक्सवेलला २३ धावांवर बाद केले, तर मार्कस स्टॉयनिस ७ धावा करत अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण एका बाजूने फिंच किल्ला लढवत होता.
शेवटच्या दोन षटकात १६ धावांची ऑस्ट्रेलियाला गरज असताना हर्षल पटेलने संथ चेंडूवर फिंचचा त्रिफळा उडवला. त्याने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची तुफानी खेळी केली. यजमानांना ६ चेंडूंत ११ धावांची गरज असताना मोहम्मद शमी २०व्या षटकात पहिले षटक टाकण्यासाठी आला. विराटने सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. त्यानंतर अॅश्टन अॅगर धावबाद झाला. पुढील दोन चेंडूत शमीने जॉश इंग्लिस व केन रिचर्डसन यांचा त्रिफळा ऊडवून टीम हॅटट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी परतला. महत्त्वाच्या क्षणी विकेट्स मिळाल्याने भारताने हा सामना ६ धावांनी जिंकला.