Taskin Ahmed apologises for missing team bus : टी-२० विश्वचषक २०२४ ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडली. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. दरम्यान, आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरं तर, भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सुपर-८ सामन्यात बांगलादेशच्या एका अनुभवी खेळाडूची झोप लागली होती. त्यामुळे त्याची बस चुकली होती. यासाठी संघ व्यवस्थापनाने या खेळाडूला शिक्षाही केली. त्यानंतर आता हा खेळाडू आपल्या सहकाऱ्यांची माफी मागत आहे.
कोण आहे हा दिग्गज खेळाडू?
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी उशिरा झोपलेला खेळाडू म्हणजे बांगलादेशचा स्टार गोलंदाज तस्किन अहमद. तो बांगलादेशच्या टी-२० संघाचा उपकर्णधारही आहे. तस्किन अहमदने २०२४ च्या टी-२० विश्वचषकातीव ७ सामन्यात एकूण ८ विकेट्स घेतल्या. तस्किन अहमदने ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात २-२ विकेट्स घेतल्या होत्या. या चमकदार कामगिरीने सुपर-८ मधील त्याची दावेदारी चांगलीच भक्कम झाली होती.
भारताविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधून वगळले –
जेव्हा बांगलादेश संघ सुपर-८ मध्ये भारताचा सामना करत होता, तेव्हा नाणेफेकीनंतर बांगलादेशच्या कर्णधाराने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली, तेव्हा संघात एक बदल करण्यात आला होता. ज्यामध्ये संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या जागी जॅकर अलीचा समावेश करण्यात आला होता. या बदलामुळे बांगलादेश क्रिकेट संघाचे चाहते आश्चर्यचकित झाले, कारण तस्किन अहमद चांगल्या फॉर्ममध्ये असून भारताविरुद्ध चांगला खेळू शकला असता. अचंबित झालेल्या चाहत्यांना त्यावेळी काहीच समजले नाही. पण आता तस्किन अहमदला संघात स्थान का मिळाले नव्हते, याबद्दल आता खुलासा झाला आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : “मला T20I क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची नव्हती पण…”, हिटमॅनचा VIDEO होतोय व्हायरल
बांगलादेश आणि भारत यांच्यात २२ जून रोजी सामना झाला होता. हा सुपर-८ चा सामना बांगलादेशसाठी खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात सहभागी होण्यासाठी बांगलादेशचा संघ सकाळीच स्टेडियमकडे रवाना झाला. संघाचे सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी बसमध्ये येऊन बसले होते. दरम्यान, वेगवान गोलंदाज तस्किन अहमदची सर्व संघ वाट पाहत होता. त्यावेळी तस्किन अहमद कोणाचाही फोन उचलत नव्हता.
बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा संघासह स्टेडियमकडे रवाना झाले. ज्यामुळे तस्किन अहमदला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. क्रिकट्रॅकर स्पोर्ट्स वेबसाइटनुसार, तस्किन अहमद झोपला होता. तो हॉटेलमधून खाली आला तेव्हा बस निघून गेली होती. यानंतर तो स्वत:हून स्टेडियममध्ये पोहोचला.
आता मागतोय माफी –
बांगलादेश बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “हे खरे आहे की, तस्किन नंतर संघात सामील झाला. कारण त्याची टीम बस चुकली. पण तो का खेळला नाही हे फक्त प्रशिक्षकच सांगू शकतात. भारताविरुद्धच्या सामन्यात तो संघाच्या योजनेचा भाग होता की नाही याचे उत्तर फक्त प्रशिक्षकच देऊ शकतात. जर प्रशिक्षक किंवा खेळाडूंमध्ये मतभेद झाले असते, तर तो अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात कसा खेळला असता. तस्किन अहमदने वेळेवर उठू न शकल्याबद्दल त्याने खेळाडू आणि इतर सर्वांची माफी मागितली होती.”