१३ नोव्हेंबर हा इंग्लंडसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. कारण त्यांनी पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून टी-२० विश्वचषक २०२२ जिंकून स्वत:ला वनडे पाठोपाठ टी-२० क्रिकेटचे चॅम्पियन सिद्ध केले. इंग्लंडला सुपर १२ टप्प्यात आयर्लंडविरुद्ध आश्चर्यकारक पराभव पत्करावा लागला होता. तरीही अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले. बेन स्टोक्स हा, २०१६ च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडसाठी खलनायक ठरला होता.परंतु तो २०२२ मध्ये एमसीजी येथे अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना नायक ठरला. विजयानंतर कर्णधार जोस बटलरच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली.
इंग्लंडने विजयी धावा घेताच ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष सुरु झाला होता. नंतर विजेत्या कर्णधार जोस बटलरच्या हातात ट्रॉफी देण्यात आली, तेव्हा शॅम्पेनच्या बाटल्या उघडण्यास सुरुवात होणार होती. तेव्हा बटलरने सर्वांना थांबवले. इंग्लंड संघात आदिल रशीद आणि मोईन अली असे दोन इस्लामिक अनुयायी होते आणि बाकीच्या संघाने शॅम्पेन समारंभ सुरू करण्यापूर्वी दोघांनाही बाजूला होण्यासाठी वेळ दिला. त्याच्या या एका कृतीने सर्वांचे मने जिंकली.
बटलरने आपल्या सहकाऱ्यांच्या इच्छेचा आदर करत प्रथम संपूर्ण संघासोबत एक फोटो क्लिक करण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर त्यांना शॅम्पेन समारंभाची आठवण करून दिली. टीमचे इतर सदस्य शॅम्पेनच्या बाटल्या उघडून आनंद साजरा करत असताना रशीद आणि मोईन निघून बाजूला निघून गेले.
मागील वर्षी उस्मान ख्वाजाच्या इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस विजयानंतर पॅट कमिन्सने देखील अशीच कृती केली होती. कारण त्याने इतरांना शॅम्पेन बाटल्या उघडण्यापासून रोखले आणि विजयाचे क्षण आणि छायाचित्रे पूर्ण करण्यासाठी ख्वाजाला स्टेजवर बोलावले होते. क्रिकेट हा खेळ धार्मिक भेदभावाला परवानगी देत नाही आणि प्रत्येक धर्माला स्वतःचा सन्मान मिळतो हेही यातून दिसून आले.