टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाने सुपर-१२ मध्ये एकूण पाच सामने खेळले. आर अश्विनचा सर्व सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचवेळी, जादुई फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला आतापर्यंत आर अश्विनच्या उपस्थितीत एकही संधी मिळालेली नाही. अश्विनने या टी२० विश्वचषकाच्या पाच डावांत आतापर्यंत ६ बळी घेतले आहेत. त्याच वेळी, त्याने केवळ ७.५२ च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या आहेत. मात्र यादरम्यान भारताचे माजी कर्णधार कपिल देव अश्विनच्या गोलंदाजीवर समाधानी नाही.
अश्विनबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले की, ”आतापर्यंत अश्विनने मला शंभर टक्के विश्वास दिलेला नाही. त्याने गडी बाद केले, पण हे गडी बाद त्याने केल्याचे वाटतच नाही. किंबहुना, फलंदाज स्वतःच्या चुकीने बाद झाले असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अश्विन १-२ गडी बाद करत होता पण तो चेहरा लपवत होता. विकेट घेतल्याने साहजिकच तुमचा आत्मविश्वास वाढतो पण अश्विनला आम्ही ओळखतो, त्याची गोलंदाजीतील लय, आक्रमकपणा आम्हाला माहिती आहे आणि हेच त्याच्यात कमी वाटत होते.”
उपांत्य फेरीत अश्विन की चहल?
उपांत्य फेरीतील सामन्यात आर. अश्विन की युजवेंद्र चहल याबाबत कपिल देव यांनी आपले मत रोखठोकपणे मांडले आहे. कपिल देव म्हणतात की, “ते संघ व्यवस्थापनावर अवलंबून असते. त्यांचा अश्विनवर विश्वास असेल तर ते चांगले आहे. तो संपूर्ण मालिका खेळला आहे, गरज पडल्यास तो आणखी आपल्या गोलंदाजीत वेगळ्या प्रकारचा बदल करून संघाच्या गोलंदाजीला आणखी मजबूत करू शकतो. पण विरोधकांना चकित करायचे असेल तर ते नेहमीच मनगटाचा फिरकी म्हणजेच रिस्ट स्पिनर गोलंदाज चहलचा पर्याय निवडू शकतात. संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराचा विश्वास जिंकणाराच उपांत्य फेरीतील सामन्यात खेळेन.”