Virat Kohli extends gratitude to PM Modi : विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीम इंडियासह टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या विराट कोहलीचे कौतुक केले. यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोहलीची स्तुती केली होती, त्यानंतर विराटने प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले आहेत.
विराट कोहलीने मानले मोदींचे आभार –
विराट कोहलीने अलीकडेच टी-२० विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक खास पोस्ट केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना विराट कोहलीने त्यांचे आभार मानले आहे. विराट कोहलीने पोस्ट केली ज्यामध्ये लिहिले, “आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. विश्वचषक ट्रॉफी मायदेशात आणणाऱ्या या संघाचा एक भाग असणं, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. यामुळे देशवासीयांना झालेला आनंद पाहून आम्हीही खूप भारावून गेलो आहोत.”
पंतप्रधान मोदींकडून विराटचे कौतुक –
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराटबद्दल एक्सवर लिहिले होते, “प्रिय विराट कोहली, तुझ्याशी बोलून छान वाटलं. फायनलमधील खेळीप्रमाणे तू सातत्याने भारतासाठी दमदार कामगिरी केली आहेस. टेस्ट, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात तुझ्या बॅटने वर्चस्व गाजवलं आहेस. टी२० प्रकारात आता तू नसशील पण या प्रकारात तुझं योगदान विसरता येणार नाही. पण मला खात्री आहे की तू नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देत राहशील.
रोहित-जडेजानेही घेतली निवृत्ती –
संपूर्ण टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची कामगिरी खराब राहिली होती. मात्र त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपले जुने रुप दाखवले आणि ७६ धावांची निर्णायक खेळी साकारली. ज्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. यानंतर आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा करणारा कोहली संघातील एकमेव खेळाडू नव्हता. त्याच्यापाठोपाठ रोहितने विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा टी-२० आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेणारा तिसरा खेळाडू ठरला.
© IE Online Media Services (P) Ltd